किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या दोन्ही संघांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे शनिवारच्या अखेरच्या सामन्यात फक्त हंगामाचा शेवट गोड करण्याचीच संधी त्यांच्यापुढे असेल.
पुण्याने मागील सामन्यात याच ठिकाणी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध विजय मिळवला होता. तर पंजाबने मागील दोन्ही सामन्यांमध्ये अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याकडून पराभव पत्करला आहे. याच मैदानावर पंजाबने मुंबई इंडियन्सविरुद्ध आपला चौथा आणि अखेरचा विजय
मिळवला होता.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात आपल्या नेतृत्वाची छाप पाडत संघाला बाद फेरीपर्यंत घेऊन जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा पुणे संघ साखळीतच गारद झाला आहे. केव्हिन पीटरसन, स्टीव्ह स्मिथ, फॅफ डू प्लेसिस आणि मिचेल मार्श यांच्या माघारी पुण्याचा संघ अधिक कमकुवत झाला.
मागील हंगामाचीच यंदा पुनरावृत्ती झाली, असे पंजाबच्या बाबतीत म्हणता येईल. परदेशी खेळाडूसुद्धा त्यांचे भाग्य पालटू शकले नाही. डेव्हिड मिलरसह दर्जेदार खेळाडूंची खराब कामगिरी हे पंजाबच्या अपयशाचे खरे कारण आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि शॉन मार्श यांच्यासारखे सातत्यपूर्ण कामगिरी करणारे खेळाडू गेल्यानंतर पंजाबच्या समस्येत आणखी भर पडली. याशिवाय संघ व्यवस्थापन आणि मालक यांच्यातील वादाची कुजबुज कानी येऊ लागली आहे.