ल्युकास पौऊलीचा खळबळनजक विजय; जोकोव्हिच, सोंगा, मॉनफिल्सची आगेकूच

दुखापतींना टक्कर देत राफेल नदालने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांसह यशस्वी पुनरागमन केले होते. तब्बल १४ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणारा राफेल नदाल अमेरिकन खुल्या स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. मात्र २२ वर्षीय फ्रान्सच्या ल्युकास पौऊलीने नदालचा विजयरथ रोखत कारकीर्दीतील खळबळजनक विजयाची नोंद केली. पाचव्या सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत ल्युकासने नदालवर ६-१, २-६, ६-४, ३-६, ७-६ (८-६) अशी मात केली. अन्य लढतीत नोव्हाक जोकोव्हिच, जो विलफ्रेड सोंगा, गेइल मॉनफिल्स यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मनगटाच्या दुखापतीमुळे नदालला लाडक्या फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतून माघार घ्यायला लागली होती. दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने नदाल विम्बल्डन स्पर्धेतही सहभागी होऊ शकला नाही. योग्य उपचार आणि आहाराच्या बळावर नदालने ऑलिम्पिक स्पर्धेत स्पेनला दोन पदके मिळवून दिली. रॉजर फेडररच्या अनुपस्थितीत नदाल नोव्हाक जोकोव्हिचच्या सद्दीला आव्हान देणार असे चित्र होते. मात्र ल्युकासच्या झुंजार खेळामुळे नदालला गाशा गुंडाळावा लागला आहे. २००४ नंतर वर्षांतील एकाही ग्रँड स्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीही गाठता न आल्याची नदालची ही पहिलीच वेळ आहे.

खोलवर मैदानी आणि शैलीदार फटक्यांच्या जोरावर ल्युकासने बाजी मारली. नदालने ५२ विजयी फटक्यांसह ल्युकासला प्रत्युत्तर दिले. मात्र ते अपुरे ठरले. पाचव्या सेटमध्ये टायब्रेकरमध्ये नदाल ३-६ असा पिछाडीवर होता. मात्र चिवट झुंज देण्यासाठी प्रसिद्ध  नदालने तीन मॅचपॉइंट वाचवले. मात्र त्यानंतर त्याचा फोरहँडचा फटका नेटवर आदळला आणि ल्युकासने विजयाचा जल्लोश साजरा केला.

‘मी शेवटपर्यंत लढत दिली. हा सामना कोणीही जिंकू शकले असते. खेळात आणखी सुधारणा होणे आवश्यक आहे,’ असे नदालने सांगितले. लहान असताना मी नदालचे सगळे सामने टीव्हीवर पाहत असे. त्याच्याविरुद्ध जिंकता आल्याने प्रचंड आनंद झाला आहे असे ल्युकासने सांगितले.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ल्युकाससमोर गेइल मॉनफिल्सचे आव्हान असणार आहे. मॉनफिल्सने मार्कोस बघदातीसचा ६-३, ६-२, ६-३ असा पराभव केला. नवव्या मानांकित जो विल्फ्रेड सोंगाने जॅक सॉकवर ६-३, ६-३, ६-७ (७-९), ६-२ अशी मात केली. सोंगासमोर पुढच्या लढतीत नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान असणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आणि अव्वल मानांकित जोकोव्हिचने कायले एडय़ुमंडला ६-२, ६-१, ६-४ असे सहजपणे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. हाताला झालेल्या दुखापतीमुळे जोकोव्हिचला विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. दुसऱ्या लढतीत प्रतिस्पर्धी जिरी वेस्लीने माघार घेतल्याने जोकोव्हिचला पुढे चाल मिळाली. तिसऱ्या लढतीदरम्यान मिखाइल युझनीने दुखापतीमुळे माघार घेतल्याने जोकोव्हिचला विजयी घोषित करण्यात आले. भरपूर विश्रांती मिळाल्याने ताजातवाना असलेल्या जोकोव्हिचने लौकिकाला साजेसा खेळ करत सरशी साधली.

महिलांमध्ये अँजेलिक कर्बरने पेट्रा क्विटोव्हाला ६-३, ७-५ असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. या विजयासह कर्बरच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची शक्यता वाढली आहे.

अव्वल स्थान टिकवण्यासाठी सेरेना विल्यम्सला अंतिम फेरीत धडक मारणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद नावावर असणाऱ्या कर्बरने आक्रमक आणि अचूक खेळ करत पेट्राला निष्प्रभ केले. उपांत्यपूर्व फेरीत कर्बरचा सामना अनुभवी रॉबर्टा व्हिन्सीशी होणार आहे. व्हिन्सीने लेसिआ सुरेन्कोचा ७-६ (५), ६-२ असा पराभव केला.

अ‍ॅनास्तासिजा सेव्हास्टाकोव्हाने जोहाना कोन्टाला ६-४, ७-५ असे नमवत उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले. २२ वर्षांनंतर लॅटव्हिआच्या महिला खेळाडूने ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे.

जागतिक क्रमवारीत ४८व्या स्थानी असलेल्या सेव्हास्टाकोव्हाने दुसऱ्या फेरीच्या लढतीत तृतीय मानांकित गार्बिन म्युगुरुझावर सनसनाटी विजय मिळवला होता. अन्य लढतीत कॅरोलिन वोझ्नियाकीने मॅडिसन की हिचे आव्हान ६-३, ६-४ असे संपुष्टात आणले.

रोहन बोपण्णाचे आव्हान संपुष्टात

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा सहकारी गॅब्रिएला डाब्रोवस्की जोडीचे मिश्र प्रकारातील आव्हान संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत रॉबर्ट फराह आणि अ‍ॅना लेना ग्रोइनफिल्ड जोडीने बोपण्णा-डाब्रोव्हस्की जोडीवर १-६, ६-२, १०-८ असा विजय मिळवला.