भारतीय संघाचा माजी कसोटीपटू आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदाची सुत्र सांभाळत असलेल्या राहुल द्रविडची, लाभाचं पद भूषवल्याच्या आरोपांमधून मुक्तता करण्यात आलेली आहे. बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांनी आज या प्रकरणात आपला निकाल दिला आहे. “राहुल द्रविड विरोधातली तक्रार मी फेटाळत आहे, त्याच्यावर लाभाचं पद भूषवल्याचा आरोप सिद्ध होत नाहीये”, जैन यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे.

“द्रविडवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये मला कोणत्याही प्रकारे हितसंबंध जपल्याचं किंवा लाभाचं पद भूषवल्याचं जाणवलं नाही. त्यामुळे राहुल द्रविडला मी दोषमुक्त करत आहे.” जैन यांनी पत्रकारांशी बोलत असताना माहिती दिली. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी द्रविडविरोधात तक्रार दाखल केली होती.

राहुल द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षासोबत इंडियन सिमेंट कंपनीत उपाध्यक्ष पदावर काम करतो. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मालक एन.श्रीनीवासन यांच्या मालकीची ही कंपनी असल्यामुळे राहुलवर हितसंबंध जपल्याचा आणि लाभाचं पद भूषवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र लोकपालांनी दिलेल्या निर्णयानंतर राहुलची या आरोपांमधून सुटका करण्यात आलेली आहे.