भारतीय संघातील एकेकाळचा भरवशाचा फलंदाज राहुल द्रविडने आयसीसीच्या नव्या नियमावलीमुळे क्रिकेटच्या खेळाचे समीकरण बदलेल, असे मत व्यक्त केले. आयसीसीच्या नव्या नियमावलीमध्ये बॅटच्या आकारासंबंधी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. यात बॅटची लांबी १०८ मिली मीटर आणि रुंदी ४० ते ६७ मिलीमीटरपेक्षा अधिक नसावी, असे निर्बंध घालण्यात आले आहेत.

बॅटच्या आकारातील हे बदल क्रिकेटच्या खेळातील समीकरण बदलणारे ठरतील, असे द्रविडला वाटते. त्याचा खेळाच्या निकालावर परिणाम होईल, असेही द्रविड म्हणाला. बॅटच्या आकारामध्ये करण्यात आलेले बदल हे फार मोठे नाहीत. फारच कमी खेळाडू या नियमापलीकडे जाऊन बॅट वापरतात, असे सांगत त्याने हे नियम स्वागतार्ह असल्याचे म्हटले. बॅटच्या आकाराशिवाय अन्य घटकही क्रिकेटच्या खेळावर परिणाम करणारे असतात, याकडेही द्रविडने लक्ष वेधले.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात द्रविडने हजेरी लावली होती. यावेळी तो म्हणाला की, खेळपट्टी आणि सीमारेषेचे अंतर या गोष्टी खेळामध्ये अधिक महत्त्वूर्ण आहेत. यावेळी द्रविडला भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर द्रविड म्हणाला की, सध्याच्या घडीला भारतीय महिला संघासोबत असणारा स्टाफ हा सर्वश्रेष्ठ आहे. सध्या द्रविड भारत ‘अ’ आणि १९ वर्षाखालील भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे.

या कार्यक्रमात द्रविडने महिला क्रिकेट आयपीएलविषयी देखील मत मांडले. महिला क्रिकेटमध्ये आयपीएलची सुरुवात झाल्यास देशांतर्गत स्तरावरील महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. तसेच ही संकल्पना आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी फायदेशीर ठरेल, असे द्रविडने सांगितले.