भारतीय महिला संघाची वरिष्ठ क्रिकेटपटू मिताली राज व प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वादामुळे महिला क्रिकेटसाठी मागील काही दिवस अत्यंत निराशाजनक गेले. शुक्रवारी पोवार यांच्या हंगामी प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ तीन महिन्यांनंतर संपुष्टात आल्यावर पुन्हा पोवारची प्रशिक्षकपदी निवड होणे कठीण मानले जात आहे.

पोवारचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. पण जरी भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवारने या पदासाठी अर्ज केला तरी त्याच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असे समजते. ‘‘पोवारला पुन्हा महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी आणणे ही घोडचूक ठरेल,’’ असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राजला वगळल्यामुळे भारतीय महिला क्रिकेटमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. आपली कारकीर्द बरबाद करण्याचा प्रयत्न पोवारने केल्याचा आरोप मितालीने केला आहे. तर सलामीसाठी मला पाठवले नाही तर निवृत्त होईन, असा इशारा मितालीने दिल्याचा आरोप पोवारने केला आहे.