भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या सुमार कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू अमित पागनीस याने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या मुंबईच्या प्रशिक्षकपदी आता पोवारची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारताकडून दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेल्या ४२ वर्षीय रमेश पोवारने याआधी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली आहे. त्याचबरोबर बेंगळूरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काम करणाऱ्या पोवारकडे प्रशिक्षणाचा अनुभव असल्याने त्याच्याकडे मुंबईचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे.

‘‘मुंबई संघात निरोगी आणि सकारात्मक वातावरण राखण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मुंबईकडून अव्वल दर्जाच्या क्रिकेटचे प्रदर्शन होईल, यासाठी मी प्रयत्नशील असेन,’’ असे पोवारने सांगितले. विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी मुंबईसह ड गटात दिल्ली, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पुद्दुचेरी या संघांचा समावेश आहे. मुंबईचे साखळी गटातील सामने जयपूर येथे होणार आहेत.