रणजी विश्वात महाराष्ट्र संघाच्या स्वप्निल गुगळ आणि अंकित बावणे यांनी ऐतिहासिक भागीदारीची नोंद केली आहे. दोघांनी तिसऱया विकेटसाठी तब्बल ५९४ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे. क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. वानखेडेवर सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेत दिल्ली विरुद्धच्या सामन्यात स्वप्निल आणि अंकितने ही विक्रमी कमाल केली आहे. सामन्यात स्वप्निल गुगळे याने ५२१ चेंडूत ३७ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद ३५१ धावांची खेळी केली, तर अंकित बावणे याने ५०० चेंडूत १८ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद २५८ धावांचे योगदान दिले आहे. रणजी करंडक स्पर्धेत त्रिशतक ठोकणारा स्वप्निल गुगळे हा महाराष्ट्राचा चौथा फलंदाज ठरला आहे. स्वप्निल आणि अंकित यांनी याआधाचा विजय हजारे आणि गुल मोहम्मद जोडीचा विक्रम मोडीत काढला. हजारे आणि मोहम्मद यांनी रणजी सामन्यात बडोद्याकडून खेळताना ५७७ धावांची भागीदारी केली होती. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, परंतु अल्पावधीत त्यांची २ बाद ४१ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. सलामीवीर हर्षद खडिवाले(१०) आणि चिराग खुराना (४) यांना नवदीप सैनीने सकाळच्या पहिल्या अर्ध्या तासातच बाद केले होते. त्यानंतर स्वप्निल गुगळे आणि अंकित बावणे यांनी मैदानात टिच्चून फलंदाजी करत संघाला सावरले. महाराष्ट्राच्या संघाने आपला डाव ६३५ धावांवर घोषित केला आहे.