छत्तीसगडची ३ बाद १३१ धावांपर्यंत मजल; अद्याप १५८ धावांनी पिछाडीवर

पुणे : कर्णधार हरप्रीत सिंग (खेळत आहे ५९) आणि आशुतोष सिंग (३४) यांनी केलेल्या संयमी फलंदाजीमुळे छत्तीसगडने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्राविरुद्धच्या ‘क’ गटातील सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १३१ धावा केल्या आहेत. छत्तीसगडला पहिल्या डावात आघाडी घेण्यापासून रोखण्यासाठी महाराष्ट्राला पुढील १५८ धावांत त्यांचे सर्व फलंदाज बाद करणे आवश्यक आहे.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात बुधवारच्या ६ बाद २३८ धावांवरून पुढे खेळताना महाराष्ट्राचा पहिला डाव २८९ धावांत आटोपला. शतकवीर ऋतुराज गायकवाड (१०८) व्यतिरिक्त विशांत मोरे (५३) आणि सत्यजित बच्छाव (३५) यांनी महाराष्ट्रासाठी उपयुक्त योगदान दिले.

प्रत्युत्तरात छत्तीसगडने पहिल्या २५ धावांत सलामीवीरांना गमावले. मात्र आशुतोष आणि हरप्रीत यांनी ८० धावांची भागीदारी रचून संघाला सावरले. आशुतोष बाद झाल्यानंतर अमनदीप खरेच्या (खेळत आहे ९) साथीने हरप्रीतने उर्वरित दिवस खेळून काढला. अनुपम संकलेचा, मुकेश चौधरी आणि चिराग खुराना यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला आहे.

 

संक्षिप्त धावफलक

’ महाराष्ट्र (पहिला डाव) : ९५.४ षटकांत सर्व बाद २८९ (ऋतुराज गायकवाड १०८, विशांत मोरे ५३; वीर प्रताप सिंग ५/८०)

’ छत्तीसगड (पहिला डाव) : ४७ षटकांत ३ बाद १३१ (हरप्रीत सिंग खेळत आहे ५९, आशुतोष सिंग ३४; चिराग खुराना १/१८)