ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा चेतेश्वर पुजारा याने रणजी करंडक स्पर्धेत शतकी खेळी करत सौराष्ट्र संघाला अंतिम फेरीत पोहोचवले आहे. पुजाराने झळकावलेल्या नाबाद १३१ धावांच्या जोरावर सौराष्ट्रने उपांत्य फेरीत कर्नाटकवर पाच गडी राखून मात केली आणि रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुसंडी मारली.

रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठण्याची सौराष्ट्रची ही तिसरी वेळ ठरली आहे. आता ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान रंगणाऱ्या अंतिम फेरीत सौराष्ट्रची गाठ गतविजेत्या विदर्भशी पडणार आहे. कर्नाटकने विजयासाठी ठेवलेल्या २७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुजारा आणि शेल्डन जॅक्सन (१००) यांनी शतकी खेळी साकारत सौराष्ट्रला विजय मिळवून दिला. पाचव्या दिवशी विजयासाठी ५५ धावांची आवश्यकता असताना जॅक्सनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले १६वे शतक साजरे केले. पुजारा आणि जॅक्सन यांनी २१४ धावांची भागीदारी रचली.

या आधी सौराष्ट्रने २०१२-१३ आणि २०१५-१६ या हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण दोनही वेळेस मुंबईच्या संघाने त्यांना पराभूत केले होते.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक (पहिला डाव) : २७५ / सौराष्ट्र (पहिला डाव) : २३६ // कर्नाटक (दुसरा डाव) : २३९ / सौराष्ट्र (दुसरा डाव) : ९१.४ षटकांत ५ बाद २७९ (चेतेश्वर पुजारा नाबाद १३१, शेल्डन जॅक्सन १००; विनय कुमार ३/७५)