मध्यमगती गोलंदाज दिवेश पठाणिया आणि सचिदानंद पांडे यांनी प्रत्येकी पाच बळी मिळवत महाराष्ट्राचा दुसरा डाव १४७ धावांत गुंडाळला. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या क-गटात सेनादलाने महाराष्ट्राचा एक डाव आणि ९४ धावांनी मानहानिकारक पराभव केला.

रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राने ५ बाद ९३ धावसंख्येवर दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. परंतु खेळपट्टीवर टिकाव धरणाऱ्या नौशाद शेखचा (४१) अडसर पांडेने दूर करून महाराष्ट्राला सकाळी पहिला हादरा दिला. यष्टिरक्षक नकुल वर्माने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

शनिवारी दुखापतीमुळे माघारी परतलेला सलामीवीर मूर्तझा ट्रंकवाला पुन्हा फलंदाजीसाठी उतरला. परंतु दोन चौकारांसह फक्त ९ धावा काढून तो माघारी परतला. विशांत मोरेने तीन धावांची भर घालत ३६ धावा केल्यावर पांडेने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर तळाच्या फलंदाजांकडून फारसा प्रतिकार न झाल्यामुळे महाराष्ट्राचा दुसरा डाव ४८.१ षटकांत १४७ धावांवर आटोपला. ११व्या क्रमांकावरील मुकेश इंगळेने दोन चौकार आणि एका षटकारासह नाबाद १४ धावा केल्या, तर मुकेश चौधरीने १४ धावा काढल्या.

सेनादलाने महाराष्ट्राचा पहिला डाव फक्त ४४ धावांवर गुंडाळल्यानंतर २८५ धावा उभारल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा डाव १४७ धावांवर कोसळला. त्यामुळे सेनादलाने क-गटातील दुसऱ्या विजयाद्वारे खात्यावर ७ गुणांची भर घातली.

संक्षिप्त धावफलक

* महाराष्ट्र (पहिला डाव) : ४४

* सेनादल (पहिला डाव) : २८५

* महाराष्ट्र (दुसरा डाव) : ४८.१ षटकांत सर्व बाद १४७ (नौशाद शेख ४१; दिवेश पठाणिया ५/४९, सचिदानंद पांडे ५/५६)

* सामनावीर : सचिदानंद पांडे

* गुण : सेनादल ७, महाराष्ट्र ०