ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांमध्येही भागीदाऱ्या होणे महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने शुक्रवारी व्यक्त केली.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादशविरुद्धच्या सामन्यात अश्विनने २४ षटके गोलंदाजी करून एक बळी मिळवला आहे. आगामी कसोटी मालिकेतील भारतीय गोलंदाजांपुढील आव्हानांविषयी अश्विन म्हणाला, ‘‘गोलंदाजांना फलंदाजांवर वर्चस्व मिळवण्यासाठी भागीदाऱ्या करणे महत्त्वाचे आहे. एका गोलंदाजाने आक्रमक क्षेत्ररक्षणासह बळी मिळवण्याच्या हेतूने गोलंदाजी केल्यास दुसऱ्याने धावा रोखण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे फलंदाजांना धावा काढणे कठीण होते. मात्र अखेरीस प्रत्येक गोलंदाज फलंदाजाला बाद करण्यासाठीच मेहतन घेतो, हे खरे.’’

हार्दिक पंडय़ाच्या अनुपस्थितीत चार प्रमुख गोलंदाजांवरील जबाबदारी वाढली आहे, असे अश्विनला वाटते. तो म्हणाला, ‘‘इंग्लंड-दक्षिण आफ्रिकेत हार्दिकने पाचव्या गोलंदाजाची भूमिका नेटाने बजावली. मात्र या वेळी आम्हाला त्याची उणीव नक्कीच भासेल. त्यामुळे वेगवान गोलंदाजांप्रमाणेच आम्हा फिरकीपटूंनासुद्धा आता विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत.’’

सराव सामन्यात अधिकाधिक बळी मिळवण्यात अपयशी ठरलो असलो तरी कसोटी मालिकेत आपण कामगिरीत सुधारणा करू, असेही अश्विनने सांगितले.

पृथ्वी शॉला दुखापतीनंतर प्रचंड वेदना होत होत्या. तो लवकरच बरा होईल, अशी आशा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो पहिल्यांदाच खेळण्यासाठी आला होता. पण दुर्दैवाने नशिबाने त्याला साथ दिली नाही. प्रत्येकाच्या बाबतीत असे अभावानेच घडते.    – रवीचंद्रन अश्विन, फिरकी गोलंदाज