फलंदाजीत कर्णधार अ‍ॅरॉन फिंच, स्टिव्ह स्मिथ आणि गोलंदाजीत अ‍ॅश्टन अ‍ॅगरने केलेल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर, ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात केली आहे. जोहान्सबर्गच्या मैदानात कांगारुंनी आफ्रिकेला विजयासाठी १९७ धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र हे आव्हान त्यांना पेलवलं नाही, अ‍ॅगरच्या फिरकीसमोर आफ्रिकन फलंदाजांनी शरणागती पत्कारली. अ‍ॅश्टन अ‍ॅगरने आठव्या षटकात फाफ डु प्लेसिस, अँडल फेलुक्वायो आणि डेल स्टेन यांना माघारी धाडत हॅटट्रीकची नोंद केली.

रविंद्र जाडेजा

 

दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गारद करणाऱ्या अ‍ॅगरने आपल्या आवडत्या खेळाडूचं नाव सांगितलं. अ‍ॅगर भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजाचा चाहता आहे. “भारताविरुद्ध मालिका आटोपल्यानंतर मी जाडेजासोबत छान गप्पा मारल्या. मला त्याच्यासारखं खेळायचं आहे. तो फलंदाजीत फटकेबाजी करु शकतो, त्याचं क्षेत्ररक्षण अव्वल आहे…गोलंदाजीत तो चेंडूही चांगला वळवतो. माझ्यामते तो रॉकस्टार आहे”, Espncricinfo संकेतस्थळाशी बोलताना अ‍ॅगरने जाडेजाचं कौतुक केलं.

दरम्यान, कांगारुंनकडून अ‍ॅगरने ५ तर अ‍ॅडम झॅम्पा आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी २-२ तर मिचेल स्टार्कने १ बळी घेतला. १०७ धावांनी सामना जिंकत कांगारुंनी मालिकेत आघाडीही घेतली आहे.

अवश्य वाचा – पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेवर मात, अ‍ॅश्टन अ‍ॅगरची हॅटट्रीक