चौथ्या कसोटीसाठी संघनिवडीचा पेच

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात रवींद्र जडेजा-रविचंद्रन अश्विन यांच्या फिरकी जोडीला एकत्रित खेळवावे की चार वेगवान गोलंदाजांचीच रणनीती कायम राखून एकाच फिरकीपटूला संघात स्थान द्यावे, असा पेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसमोर उभा ठाकला आहे.

ओव्हल येथे गुरुवारपासून भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला एक डाव आणि ७६ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. या कसोटीत अश्विनला न खेळवल्यामुळे अनेकांनी नाराजी दर्शवली. त्याशिवाय जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याच्या समावेशाबाबत संभ्रम कायम आहे. अशा स्थितीत चौथ्या कसोटीत भारतीय संघाच्या गोलंदाजांच्या फळीत बदल होण्याची दाट शक्यता आहे.

तिसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा ही वेगवान चौकडी आणि जडेजाच्या रूपात एकमेव फिरकीपटू भारताने खेळवला. परंतु ओव्हलच्या खेळपट्टीवर चौथ्या-पाचव्या दिवशी फिरकीपटूंना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे.