शिओमी कंपनी लवकरच भारतीय बाजारात रेडमी नोट ४ हा नवा स्मार्टफोन घेऊन येणार आहे. शिओमीच्या रेडमी नोट ४ ची विक्री फ्लिपकार्टकडून करण्यात येणार आहे. फ्लिपकार्टने या नव्या फोनला ऑल राऊंडर स्मार्टफोन म्हटले आहे. मात्र भारतीय संघातील ऑल राऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजा या स्मार्टफोनवर तितकासा खूष नसल्याचे दिसते आहे. त्यामुळेच ट्विटरवर ‘ऑल राऊंडर’ स्मार्टफोनवरुन फ्लिपकार्ट आणि रवींद्र जाडेजा यांच्यात थोडी शाब्दिक चकमक झाली आहे. रेडमी नोट ४ ला फ्लिपकार्टने ‘ऑल राऊंडर’ म्हटल्याने हा रंजक प्रकार घडला.

लवकरच एक ‘ऑल राऊंडर’ आपल्या भेटीला येणार असल्याची जाहिरात सध्या फ्लिपकार्टकडून केली जाते आहे. रेडमी नोट ४ च्या प्रसिद्धीसाठी ही जाहिरातबाजी फ्लिपकार्टकडून सुरू आहे. फ्लिपकार्टने वापरलेल्या ‘ऑल राऊंडर’ शब्दावर रवींद्र जाडेजाने प्रतिक्रिया दिल्याने या प्रकाराला सुरुवात झाली. ‘भारताचा नवा ऑल राऊंडर १९ जानेवारीला आमच्या भेटीला येतो आहे. कोण आहे तो ? तुम्ही ओळखू शकता का ?,’ अशी जाहिरात फ्लिपकार्टने रेडमी नोट ४ साठी तयार केली. जाहिरातीसाठी वापरलेल्या या ओळी फ्लिपकार्टने ट्विटरवरदेखील वापरल्या आहेत.

रेडमी नोट ४ साठी ‘ऑल राऊंडर’ शब्द वापरणाऱ्या आणि भारताचा नवा ऑल राऊंडर १९ जानेवारीला आमच्या भेटीला येतो आहे, असे ट्विट करणाऱ्या फ्लिपकार्टच्या ट्विटला रवींद्र जाडेजाने प्रत्युत्तर दिले. ‘ही भेट पुढे ढकला. मला १९ जानेवारीला क्रिकेट सामना खेळायचा आहे. आपण २० जानेवारीला भेटू,’ असे ट्विट करत रवींद्र जाडेजाने फ्लिपकार्टला प्रत्युत्तर दिले. अखेर आपण ट्विटमध्ये आणि जाहिरातीत ‘ऑल राऊंडर’ हा शब्द वापरल्याने हा प्रकार झाल्याचे फ्लिपकार्टच्या लक्षात आले. त्यानंतर थोड्याच वेळात हा संपूर्ण प्रकार थांबला.

रेडमी नोट ३ नंतर शिओमी कंपनी रेडमी ४ नोट भारतीय बाजारात आणणार आहे. येत्या १९ जानेवारीला शिओमी कंपनी रेडमी नोट ४ भारतात आणणार आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. शिओमी आणि फ्लिपकार्टकडून रेडमी ४ नोटसाठी जोरदार वातावरणनिर्मिती केली जाते आहे. सध्या रेडमी नोट ४ चीनमध्ये दोन प्रकारांमध्यो उपलब्ध आहे. २ जीबी रॅम आणि १६ जीबी मेमरी यासोबतच ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी क्षमता या दोन प्रकारांमध्ये रेडमी नोट ४ चीनमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची मेमरी वाढवता येऊ शकते.