सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि पारुपल्ली कश्यप यांच्या सुरेख कामगिरीमुळे सध्या बॅडमिंटन खेळाबाबतची लोकप्रियता वाढू लागली आहे आणि त्याचा फायदा खेळाच्याच विकासाकरिता उठवण्यासाठी हीच योग्य आहे. इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल) स्पर्धेचे आयोजन म्हणजे ‘सोने पे सुहागा’ ठरणार आहे, असे मत माजी ऑलिम्पिकपटू व बॅडमिंटन प्रशिक्षक निखिल कानेटकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कानेटकरने अनेक राष्ट्रीय व अखिल भारतीय स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविले.  अॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आयबीएल स्पर्धेसाठी त्यांची पुणे पिस्टॉन्स संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. आयबीएल स्पर्धा व बॅडमिंटनविषयी त्यांनी केलेली ही बातचीत-
पुणे पिस्टॉन्स संघाच्या प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीविषयी काय सांगता येईल?
पुणे पिस्टॉन्सचे प्रशिक्षकपद सांभाळणे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. या स्पर्धेतील प्रत्येक संघात जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सामना रंगतदार होणार आहे. स्पर्धेत खळबळजनक विजयांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच प्रत्येक सामन्याकरिता व्यूहरचना करताना प्रशिक्षकाची कसोटी लागणार आहे. मात्र शंभर टक्के कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहील.
आयबीएल स्पर्धेचा बॅडमिंटनच्या विकासाकरिता कितपत उपयोग होणार आहे?
सायना नेहवाल व अन्य भारतीय खेळाडूंनी गेल्या चार-पाच वर्षांमध्ये जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या खेळाविषयी लोकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आयबीएल स्पर्धा नेमकी याच वेळी आयोजित केली जाणार असल्यामुळे या खेळाचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फायदा होणार आहे.
भारतीय खेळाडूंना या सामन्यांमध्ये भाग घेण्याबाबत मर्यादा असतील का?
प्रत्येक संघात चार परदेशी खेळाडूंचा समावेश असला तरी एका सामन्यात जास्तीत जास्त तीनच परदेशी खेळाडूंना भाग घेता येणार आहे. त्यामुळे भारताच्या किमान दोन खेळाडूंना प्रत्यक्ष खेळण्याची संधी मिळेल. संघातील सर्व खेळाडू अठरा दिवस एकत्र असतील. एखाद्या भारतीय खेळाडूला प्रत्यक्ष सामन्यात भाग घेण्याची संधी मिळाली नाही, तरी परदेशी खेळाडूंची खेळण्याची शैली, त्यांचा सराव, आहार, पूरक व्यायाम, त्यांची देहबोली आदी गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे. ही शिदोरी भारतीय खेळाडूंना भावी कारकिर्दीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
आयबीएल सामन्यांमधून महिला दुहेरीची लढत काढून टाकण्यात आली आहे. त्याबाबत काय सांगाल?
महिला दुहेरी लढतीला स्थान देण्यात न आल्यामुळे महिला खेळाडूंना एकेरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. या सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचा विचार करूनच संयोजकांनी एकेरीच्या सामन्यांवर भर दिला आहे. ही पहिलीच आयबीएल स्पर्धा असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा. पुढील वर्षी महिला दुहेरीचा समावेश होईल, अशी आशा आहे.
लागोपाठच्या सामन्यांमुळे खेळाडूंची दमछाक होण्याची कितपत शक्यता आहे?
या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाचे खेळाडू असल्यामुळे त्यांची शारीरिक तंदुरुस्ती ही खूपच उच्च दर्जाची असते. एका दिवशी दोन ते तीन सामने खेळण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. तसेच व्यावसायिक स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना लागोपाठ दोन-तीन स्पर्धामध्ये भाग घेण्याची सवय असते. त्यामुळे त्यांची दमछाक होणार नाही.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सहभाग मर्यादित आहे, असे वाटते का?
हो. निश्चितच. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय मोजकेच महाराष्ट्रीयन खेळाडू चमक दाखवतात. आयबीएल स्पर्धा जागतिक स्तरावरील असल्यामुळे त्या दर्जापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना अजून बरीच उंची गाठावी लागणार आहे. महाराष्ट्रात या खेळासाठी भरपूर नैपुण्य आहे. जागतिक स्तरावर चांगले यश मिळविण्याकरिता त्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. जागतिक स्तरावर पुरुष गटात पहिल्या वीस जणांमध्ये व महिला गटात पहिल्या दहा जणींमध्ये स्थान मिळविण्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना कसोशीने प्रयत्न करावे लागतील.