विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. १५ जणांच्या या संघामध्ये भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आलेली नाही. मागील काही महिन्यांपासून आपल्या फलंदाजीने चाहत्यांबरोबरच निवडसमितीलाही प्रभावित करणाऱ्या पंतला विश्वचषक स्पर्धेचे तिकीट मात्र मिळाले नाही. त्यामुळे पंतला विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी २०२३ पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

अल्पावधीतच आपल्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणातील कौशल्यामुळे सर्वांची मन जिंकलेल्या ऋषभ पंतला, विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळाली नाही. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऋषभने यष्टींमागे सर्वाधिक झेल पकडण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना पंतने आक्रमक फटकेबाजी केली होती. मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेताना ऋषभ पंतने १८ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. त्यामुळे पंतला विश्वचषक संघात स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऋषभ पंतच्या नावावर ९ कसोटी, ५ वन-डे आणि १५ टी-२० सामन्यांचा अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत त्याला संघात संधी देण्यात आली होती. या संघीचा पंतने चांगला वापर केला होता. मात्र निवडसमितीने नवख्या पंतऐवजी अनुभवी दिशेन कार्तिकवर विश्वास दाखवला असून त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.