रॉबिन उथप्पाने ‘रॉबिनहूड’प्रमाणे पराक्रम दाखवत कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयाचा अध्याय लिहिला. उथप्पाने ५२ चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकारासह साकारलेल्या ८० धावांच्या खेळीच्या बळावर कोलकाताने मुंबई इंडियन्सचा सहा विकेट आणि ८ चेंडू राखून पराभव केला. त्यामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आयपीएलच्या सातव्या मोसमातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. हे नैराश्य मुंबई संघातील खेळाडू लपवू शकले नाहीत. १० सामन्यांपैकी सात पराभव पत्करणारा हा संघ ६ गुणांसह गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे.
त्याआधी, कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने ५ बाद १४१ अशी धावसंख्या उभारली. रोहितने ४५ चेंडूंत ५१ धावांची खेळी साकारताना दोन षटकार आणि चार चौकार ठोकले.अंबाती रायुडूने २७ चेंडूंत तीन चौकार व एका षटकारासह ३३ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ५ बाद १४१ (रोहित शर्मा ५१, अंबाती रायुडू ३३; मॉर्नी मॉर्केल २/३५) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १८.४ षटकांत ४ बाद १४२ (रॉबिन उथप्पा ८०, युसूफ पठाण नाबाद २०; हरभजन सिंग २/२२). सामनावीर : रॉबिन उथप्पा.