अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून १-५ असा दारुण पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघाने खेळात सुधारणा करावी अशी अपेक्षा संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलॅन्ट ओल्टमन्स यांनी व्यक्त केली आहे.
ओल्टमन्स म्हणाले, ‘‘संघात जरी काही युवा खेळाडूंचा समावेश असला तरी त्यांच्याकडून प्राथमिक चुका होणे अपेक्षित नव्हते. त्यांनी ऑसीच्या खेळाडूंचे विनाकारण दडपण घेतले असावे. त्यांनी धारदार आक्रमण केले मात्र गोल नोंदविण्यासाठी अपेक्षित असलेल्या अचूकतेमध्ये ते कमी पडले. तसेच बचाव फळीत खूप विस्कळितपणा दिसून आला. ऑस्ट्रेलियन खेळाडू कशा चाली करीत होते यापासून त्यांनी खूप शिकण्याची आवश्यकता आहे.’’
ते पुढे म्हणाले की, ‘‘ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडूनही काही वेळा चुका होत होत्या. मात्र त्याचा फायदा घेण्यात आमचे खेळाडू कमी पडले. कोणीही तुम्हाला गोल करण्यासाठी आयती संधी देत नाही. अशा संधी निर्माण करण्यासाठी तुम्हालाच कल्पकता दाखविण्याची आवश्यकता असते. खेळाडूंमधील समन्वय वाढविण्याची गरज आहे. तसेच बचाव फळी अधिक भक्कम करण्यावर दिला पाहिजे.’’
भारताची रविवारी कॅनडाशी गाठ पडणार आहे. कॅनडाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १-३ असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी बलाढय़ न्यूझीलंडला १-१ असे बरोबरीत रोखले होते. भारताला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले होते. कॅनडाने ऑलिम्पिक पात्रता निश्चित केली आहे.
‘‘भारतीय संघातील युवा खेळाडूंना येथील स्पर्धेत अनेक बलाढय़ संघांशी लढत देण्याची संधी मिळत आहे. आशियाई स्तरावर आमच्या खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळविले आहे. मात्र आशियाई देशांच्या तुलनेत अन्य संघांची क्षमता खूप मोठी आहे व त्यांच्यावर सातत्याने मात कशी करता येईल याचा विचार आमच्या खेळाडूंनी केला पाहिजे,’’ असे ओल्टमन्स म्हणाले.