झुरिच : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे फुटबॉलप्रेम सर्वश्रुत आहे. त्यातही तो पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फार मोठा चाहता आहे. अर्जेटिनाच्या लिओनेल मेसीच्या तुलनेत रोनाल्डो सातत्याने आव्हानांना सामोरे जातो आणि दडपणाखाली संघाला सावरतो, त्यामुळे त्याच्याकडूनच मला अधिक प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रिया कोहलीने शुक्रवारी व्यक्त केली.

‘‘माझ्यासाठी रोनाल्डो सर्वाहून वरच्या स्थानावर आहे. त्याची वचनबद्धता आणि कार्यप्रणाली अतुलनीय आहे. तो ज्या क्लबचे प्रतिनिधित्व करतो, त्या क्लबला मी पाठिंबा दर्शवतो. त्याचा खेळ पाहून मला नेहमीच प्रेरणा मिळते,’’ असे ३० वर्षीय कोहली म्हणाला.

त्याशिवाय मेसीच्या तुलनेत रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय पातळीवर संघासाठी अधिक योगदान दिले असल्यामुळे माझ्यासाठी रोनाल्डोच सर्वोत्कृष्ट आहे, असेही कोहलीने सांगितले.

‘‘रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत देशासाठी सर्वाधिक योगदान दिले आहे. त्याशिवाय माझ्यामते अर्जेटिनाकडून खेळताना मेसीवर जितके ओझे नसते त्याउलट रोनाल्डोवर पोर्तुगालची भिस्त असते. त्याने अनेक समस्यांवर मात करत कारकीर्दीत इथवर मजल मारली आहे, म्हणूनच तो श्रेष्ठ आहे,’’ असे कोहली म्हणाला.