भारताने जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य फेरीतील लागोपाठ दोन सामने जिंकले असले तरी रुपिंदर सिंगच्या अनुपस्थितीमुळे पेनल्टी कॉर्नरमध्ये अपयश मिळत आहे, असे मत भारताचे प्रशिक्षक पॉल व्हॅन अ‍ॅस यांनी व्यक्त केले आहे.
भारताने पहिल्या लढतीत फ्रान्सवर ३-२ असा निसटता विजय मिळविला तर पोलंडला त्यांनी ३-० असे लीलया हरवले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरच्या अनेक संधी मिळूनही त्याचा अपेक्षेइतका लाभ घेता आला नव्हता. रुपिंदरच्या अनुपस्थितीत मनप्रीत सिंगने पहिल्या सामन्यात पेनल्टी कॉर्नरद्वारा एक गोल केला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने पाच वेळा पेनल्टी कॉर्नरच्या संधी वाया घालविल्या.
अ‍ॅस म्हणाले, ‘‘रुपिंदर हा दुखापतीमधून तंदुरुस्त झाला नव्हता. त्यामुळे त्याला या दोन सामन्यांमध्ये खेळवता आले नाही. पेनल्टी कॉर्नरबाबतचा कमकुवतपणा आम्हाला निश्चित जाणवत आहे. रुपिंदरने काल सराव केला आहे. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी लढतीत त्याला संधी दिली जाईल.’’
ड्रॅगफ्लिकर व्ही. आर. रघुनाथला संधी देण्यासाठी रुपिंदरला वगळल्याचे अ‍ॅस यांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र रुपिंदरला सराव सामन्याच्या वेळी दुखापत झाली होती.  गेले दोन वर्षे रघुनाथ व रुपिंदर यांनी भारताकडून खेळताना पेनल्टी कॉर्नरवर चांगले यश मिळवले होते. रघुनाथने संदीप सिंगची जागा घेतली असून तो भारतीय संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ झाला आहे. केवळ दोनच खेळाडूंवर अवलंबून न राहता अन्य काही खेळाडूंनीही पेनल्टी कॉर्नरद्वारा यश मिळविले पाहिजे असा अ‍ॅस यांचा हेतू आहे.
चेंडूवर नियंत्रण ठेवण्यावरच भर -ललित
‘‘सहजासहजी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना चेंडूचा ताबा देणार नाही. शक्यतो आमच्याकडेच चेंडूचे नियंत्रण राहील असा आमचा प्रयत्न राहील, असे भारतीय संघातील मध्यरक्षक ललित उपाध्यायने सांगितले. तो पुढे म्हणाला़, ‘‘पहिल्या दोन सामन्यांमध्ये आमचा खेळ समाधानकारक झाला आहे. आता पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध आम्हास खेळावे लागणार आहे. हे दोन्ही सामने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यांप्रमाणेच या सामन्यांमध्येही आम्ही सांघिक कौशल्य व समन्वय याच्या जोरावरच यश मिळवण्यावर आमचा भर राहणार आहे.’’

फिजिओथेरपिस्ट नेमण्यासाठी सायनाला नऊ लाख रुपये
नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या दृष्टीने पूर्ण वेळ फिजिओथेरपिस्ट नेमण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने बॅडमिंटनपटू सायना नेहवालला नऊ लाख रुपये मंजूर केले आहेत. १५ महिन्यांसाठी ही रक्कम तिला देण्यात येणार आहे. फिजिओथेरपिस्टची निवड करण्याचा अधिकार हा सायनालाच असेल, असे क्रीडा मंत्रालयाने पत्रकात म्हटले आहे.