रशियात होणारी विश्वचषक स्पर्धा ही अजिंक्यपद पटकावण्याची माझ्यासाठी अखेरची संधी आहे, असे मत अर्जेटिनाचा प्रमुख खेळाडू लिओनेल मेसीने व्यक्त केले. बार्सिलोना क्लबच्या मेसीला यापूर्वी विश्वविजेतेपदासह तीन वेळा प्रमुख स्पर्धाच्या जेतेपदाने हुलकावणी दिली. त्यात दोन कोपा अमेरिका स्पर्धाचा समावेश आहे, तर २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

गतउपविजेत्या अर्जेटिनाचा रशियातील सहभागही अनिश्चित होता. मात्र मेसीने गोलची हॅट्ट्रिक नोंदवून पात्रता स्पर्धेत अर्जेटिनाला इक्वेडोरवर ३-१ असा विजय मिळवून दिला आणि अर्जेटिनाचा विश्वचषक स्पर्धेतील सहभाग निश्चित केला. ‘‘विश्वचषक जिंकणे हे संघातील प्रत्येक खेळाडूचे स्वप्न आहे. तीन वेळा अंतिम फेरीतील प्रवेशाला काहीच अर्थ राहत नाही. जेतेपदालाच महत्त्व असते. आमच्यावर बरीच टीका झाली आणि आताही अपयश आल्यास ती अधिक होईल. त्यामुळे माझ्यासह संघातील प्रत्येक खेळाडूसाठी विश्वविजेतेपद पटकावण्याची ही अखेरची संधी आहे,’’ असे मेसी म्हणाला.

जर्मनीकडून २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत झालेल्या पराभवाच्या वेदना अजूनही ताज्या असल्याचे मेसी म्हणतो. ३० वर्षीय मेसी सांगतो की, ‘‘विश्वचषक जिंकणे किती आव्हानात्मक आहे, याची कल्पना आम्हाला आहे. हे खडतर लक्ष्य आहे आणि या स्वप्नवत जेतेपदाच्या आम्ही बरेच जवळ पोहोचलो होतो. फुटबॉल हा आश्चर्यकारक खेळ आहे. त्यामुळे सर्वोत्तम संघ जिंकेलच असे होत नाही. हे मी शिकलो आणि त्याचा स्वीकारही केला. २०१४चे जेतेपद आम्हाला मिळायला हवे होते, असे मला वाटते. इतक्या जवळ येऊन पराभूत होणे, ते खूप वेदनादार्यी होते.’’

अनुभवातून शिकणाऱ्या मेसीने रशियात जेतेपदाची खात्री वर्तविली आहे. अर्जेटिनासमोर गटात क्रोएशिया, आइसलँड आणि नायजेरिया या संघांचे आव्हान आहे.