रशिया व कतार यांच्याकडील अनुक्रमे २०१८ व २०२२च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनने (फिफा) पत्रकाद्वारे जाहीर केले.
आर्थिक गैरव्यवहाराचे फिफावर आरोप ठेवल्यानंतर रशिया व कतार यांनीही फिफाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देऊन हे यजमानपद मिळविले असावे व त्यामुळे त्यांच्याकडून ते काढून घेतले जाण्याची शक्यता आहे, असे स्विस वृत्तपत्राने फिफाच्या समितीचे प्रमुख डॉमनिको स्कॅला यांनी दिलेल्या मुलाखतीच्या आधारे वृत्त दिले होते.
त्यावर खुलासा करताना फिफाने कळविले की, या दोन्ही देशांना फिफाच्या कार्यकारिणीने लोकशाही पद्धतीने हे यजमानपद दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ते काढून घेण्याचा कोणताही अधिकार आम्हाला नाही.
रशियाच्या विश्वचषक स्पर्धा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू चान्स यांनी गैरव्यवहाराद्वारे यजमानपद मिळविल्याच्या आरोपांचे खंडन केले. ‘‘अत्यंत पारदर्शीपणाने आम्ही हा मान मिळविला आहे. आम्ही या स्पर्धेच्या तयारीच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. ही स्पर्धा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पाडली जाईल अशी आम्हाला खात्री आहे,’’ असे मत त्यांनी व्यक्त केले. कतारनेही याबाबत एका पत्रकाद्वारे स्कॅला यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. फिफामध्ये झालेल्या गैरव्यवहाराचा कोणताही अनिष्ट परिणाम आमच्या यजमानपदावर होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘फिफा’ला आत्मपरीक्षणाची गरज
लुसान्ने : भ्रष्टाचार आणि लाचखोरीने ग्रासलेल्या ‘फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन’ला अर्थात फिफाला कठोर, परंतु अत्यावश्यक सुधारणेची आवश्यकता असल्याचे मत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅच यांनी व्यक्त केले.
फिफामध्ये आलेले भ्रष्टाचाराचे वादळ हे २००२ मध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पध्रेचे आयोजन सॉल्ट लेक सिटीला देण्याकरीता झालेल्या लाचखोरीहून अधिक गंभीर असल्याचे बॅच यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘स्वानुभवावरून हे प्रकरण किती गंभीर आहे, याची कल्पना आम्हाला आहे. सर्व काही पणाला लागते. ते सर्व वेदनादायक असले तरी त्याची आवश्यकता आहे. आम्हीही भूतकाळात असे अनुभव घेतले आहेत. मात्र, या सर्वातून बाहेर पडत आयओसीने स्वत:ची विश्वसनीयता पुन्हा मिळवली.’’
आयओसीच्या मुख्यालयात बोलताना बॅच म्हणाले, ‘‘फुटबॉल क्षेत्राला लागलेल्या या कलंकातून बाहेर पडण्यासाठी फिफाकडून होत असलेल्या पाठपुरवठय़ाचे स्वागत करतो आणि या पुढाकाराला प्रोत्साहन देण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नाही.’’
फिफामध्ये सध्या सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची तुलना २००२च्या स्पध्रेत झालेल्या घोटाळ्याशी करणे कठीण असल्याचे बॅच म्हणाले. ‘‘त्याची विशालता प्रचंड होती. सॉल्ट लेक सिटी आणि सध्याचा फिफाच्या घोटाळ्यांची तुलना होऊच शकत नाही’’, असे त्यांनी स्पष्ट केले.