अपयशी सचिन तेंडुलकरच्या कामगिरीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. यात आता भर पडली आहे ती भारताचा माजी कर्णधार कपिल देवची. अनुभवी फलंदाज सचिनने आपल्या भवितव्याबाबत निवड समितीशी चर्चा करावी, असे मत कपिल देवने व्यक्त केले आहेत.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दारुण पराभव पत्करला. या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये सचिन अपयशी ठरला. या पाश्र्वभूमीवर भारताचा माजी कप्तान सुनील गावस्करने सचिनला निवड समितीशी भवितव्याबाबत चर्चा करण्याचा सल्ला दिला होता.
‘‘निवड समितीने सचिनशी चर्चा करावी किंवा त्याने स्वत:च निवड समितीशी बोलावे. सचिन मोकळेपणाने बोलत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे आणि निवड समिती याविषयी मौन बाळगते आहे,’’ असे कपिलने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
‘‘क्रिकेटरसिकांसाठी हे सारे काही संभ्रमाचे आहे. सचिन जेव्हा वाईट खेळतो, तेव्हा तो प्रत्येकाला टीका करण्यासाठी संधी देतो. निवड समितीने सचिनशी संवाद साधावा. सचिन हा आपला नायक आहे, याची जाणीव ठेवावी, ’’ असे कपिल पुढे म्हणाला.
मुंबईच्या वानखेडे कसोटी सामन्यात पराभव पत्करल्यानंतर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यालाही भारताच्या दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीबाबत जाब विचारण्यात आला होता. सध्याच्या भारतीय संघातील धोनीचे स्थानही प्रश्नचिन्हांकित आहे, असे मत कपिलने प्रकट केले आहे.
‘‘भारताने मुंबईत फार मोठा पराभव पत्करला. घरच्या वातावरणात अन्य संघांना वर्चस्व गाजवायला आपण संधी दिली. पण या पराभवाने काही गंभीर प्रश्न उभे ठाकले. मागील ८-१० कसोटी सामन्यांत धोनीची कामगिरी वाईट होते आहे, हे आपल्याला सर्वाना ठाऊक आहे. त्यामुळे धोनीचे अंतिम ११ जणांमधील स्थानही मला कठीण वाटते,’’ असे कपिल यावेळी म्हणाला.
‘‘जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा विजयाचे सारे श्रेय कर्णधाराला जाते. परंतु जेव्हा संघ हरतो, तेव्हा फक्त कर्णधारच दोषी ठरतो. या पराभवामुळे क्रिकेटचाहत्यांच्या भावना दुखावल्या आहेत,’’ असे तो पुढे म्हणाला.
राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ हा संक्रमण अवस्थेतून जात आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांत भारतीय संघ चांगली कामगिरी बजावेल, असा विश्वास कपिलने प्रकट केला.