लॉर्ड्स कसोटीला सरुवात होण्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय कर्णधार विराट कोहलीला मोलाचा सल्ला दिला आहे. २०१४ मधील इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहलीला अपयश आले होते मात्र, सध्या सुरु असेलल्या कसोटी मालिकेतील पिहल्या डावात १४९ आणि ५१ धावांची खेळी करत विराट कोहलीने स्वत:ला सिद्ध केले आहे. लोकं काय म्हणतात याचा फार विचार न करता दमदार फलंदाजी करत राहवे असा सल्ला सचिनने विराट कोहलीला दिला आहे.

‘कोहली आपली जबाबदारी योग्य पार पाडतोय, यापुढेही त्याने अशाच प्रकारे खेळ करत रहावे. कशाचाच विचार न करता आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करावे. एखाद्या मोठ्या खेळीनंतर तुम्ही समाधानी होता, तेव्हा तुमचे करियर खालावते. चांगल्या कामगिरीनंतर आनंदी होण्यात काहीच वावगे नाही, पण त्या आनंदाचे समाधानात रुपांतर करू नये. गोलंदाजाप्रमाणे फलंदाजावर मर्यादा नसतात. विराट कोहलीने आपल्या कामगिरीत असेच सातत्य राखावे. कोणाकडेही न लक्ष देता असेच खेळत रहावे.’ एका वेबसाईटने तेंडुलकरच्या हवाल्याने असे वृत्त दिले आहे.

जर एखादा खेळाडू प्रतिभावान असेल, तर त्याला राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी द्यायलाच हवी. अशा खेळाडूचे वय पहिले जाऊ नये, असे म्हणत तेंडुलकरने दुसऱ्या कसोटीमध्ये पंतला संधी देण्याबाबात सुचित केले आहे. तो म्हणाला की, ‘मी जेव्हा माझा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळलो, तेव्हा मी केवळ १६ वर्षांचा होतो. मी कमी वयाचा असताना खेळायला सुरुवात केली, त्याचा मला फायदा झाला.

पहिल्या कसोटीतील दमदार कामगिरीच्या जोरावर विराट कोहलीने आयसीसी क्रमवारीत स्मीथला मागे टाकत अव्वल स्थानावर कब्जा मिळवला आहे. कसोटीसह विराट एकदिवसीय क्रमवारीतही प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. उद्या लॉर्ड्सवर दुसऱ्या कसोटीला सुरवात होत आहे. विराट कोहली कसा संघ निवडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.