क्रिकेटचा देव मानला जाणारा माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीजवळील नोएडा येथे फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटची किंमत १ कोटी ६८ लाख रुपये इतकी आहे. सचिनची पत्नी अंजलीने ८ लाख ४० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरून फ्लॅट आपल्या नावावर करण्याबाबतची कायदेशीर कारवाई पूर्ण केली. सचिनचा हा फ्लॅट ‘जेपी गोल्फ कोर्स’ येथे असून, महेंद्र सिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव आणि आर. पी. सिंह यांचेदेखील याठिकाणी फ्लॅट आहेत. बॉलिवूडकर सुनील शेट्टी, राहुल देव आणि रोहित रॉय यांनीदेखील येथे फ्लॅट खरेदी केले आहेत. सचिनचा फ्लॅट ‘जेपी गोल्फ कोर्स’मधील क्रिसेंट कोर्ट या उत्तुंग इमारतीत २१ व्या मजल्यावर आहे. जेपी ग्रीनच्या जी-ब्लॉकमधील सीसी ०१-२१०३ क्रमांकाच्या या फ्लॅटचे क्षेत्रफळ ३१५० स्क्वेअर फूट इतके आहे. सहा मोठ्या खोल्या असलेला हा आलिशान फ्लॅट सुखवस्तूंनी सुसज्ज आहे. सहा वर्षांपूर्वी जेपी सिमेंटने सचिनला आपला सदिच्छादूत म्हणून नियुक्त केले होते. त्याचवेळी त्याला क्रिसेंट कोर्ट अपार्टमेंटमध्ये फ्लॅट देणार असल्याचे आश्वासन जेपी सिमेंटतर्फे देण्यात आल्याचे बोलले जाते. सचिन मुंबईत वांद्रे येथे राहतो. सचिनचा हा व्हिला ६००० स्क्वेअर फुटांचा असून, याची किंमत ८० कोटी रुपये इतकी आहे.