भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला चाहते क्रिकेटचा देव मानतात. त्याने २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीत केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या बळावर त्याला हे देवत्व प्राप्त झाले आहे. दक्षिण-पश्चिम बिहारमधील एका गावात सचिनचा पुतळा उभारून खरोखरच त्याची पूजा केली जाते. २०१३मध्येच सचिनचा हा पुतळा बिहारमध्ये उभारण्यात आला असून त्याची चाहत्यांकडून पूजा केली जाते. मात्र सध्या त्याच पुतळ्यावर छत्री बसवल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

१९ नोव्हेंबर २०१३ला पाटणा शहराच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे १७० कि.मी. अंतरावर असलेल्या कैमूर जिल्ह्यातील अटारवालिया या गावात मास्टर ब्लास्टरचा पुतळा उभारण्यात आला. भाजपा नेते आणि भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी तसेच कैमूर जिल्हा दंडाधिकारी अरविंद कुमार सिंह यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केले. या पुतळ्याची उंची ५.५ फूट इतकी असून चाहते त्या पुतळ्याची पूजाअर्चना करतात. विशेष म्हणजे या पुतळ्याबाबत एक महत्त्वाचा बदल नुकताच दिसून आला. सचिनचा चाहता सुधीर कुमार चौधरी याच्या नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट करण्यात आला. त्या फोटोनुसार पावसाळ्याचा ऋतु लक्षात घेता सचिनच्या पुतळ्यावर एक झकासपैकी छत्री उभारण्यात आली आहे.

पाहा फोटो –

वर्ल्ड कप हाती घेतलेला सचिनचा पुतळा २०१३ मध्ये उभारण्यात आला असला तरी त्यावेळी पुतळ्यावर छत्री उभारण्यात आलेली नव्हती. परंतु, सुधीर कुमार यांनी २७ जुलै २०२० ला पोस्ट केलेल्या फोटोत सचिनच्या पुतळ्याचे आणि वर्ल्ड कपचे रक्षण करणारी छत्री उभी असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, ही छत्री नक्की केव्हा उभारण्यात आली आहे हे मात्र समजलेले नाही.