आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचांसाठी सध्या विविध पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. स्निको मीटर, हॉटस्पॉट, स्टम्प माईक यासारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मैदानावर घडणारी छोट्यातली छोटी गोष्ट पकडली जाते. पायचीत म्हणजे (LBW) चा निर्णय पंचांनी दिल्यानंतर खेळाडूंना त्यावर संशय असेल तर तिसऱ्या पंचांकडे अपील करण्यासाठी संधी देण्यात येते. DRS मध्ये बॉल स्टम्पच्या बाहेरील बाजूला किंवा बेल्सवरुन अगदी काही अंतर जाऊन लागत असेल तर Umpire’s Call दिला जातो. म्हणजेच पंचानी जर खेळाडूला बाद ठरवलं असेल तर तो फलंदाज बाद होतो आणि पंचांनी खेळाडूला नाबाद ठरवलं असेल तर तो नाबाद राहतो. अनेकदा या निर्णयावरुन वादही झाला आहे. भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनेही आयसीसीला या निर्णयाबद्दल पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

“चेंडूचा किती टक्के भाग स्टम्पवर आदळतो हे महत्वाचं नाही. जर DRS मध्ये चेंडू स्टम्पवर आदळत आहे असं दिसत असेल तर मैदानावरील पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवलं असलं तरीही त्याला बाद घोषित करायला हवं. क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यामागचं हेच उद्दीष्ट आहे. सध्याच्या नियमानुसार चेंडूचा ५० टक्केपेक्षा जास्त भाग स्टम्पला आदळत असेल तरच फलंदाज बाद ठरवला जातो, पण मला हे पटत नाही. हा निर्णय टेनिससारखा व्हायला हवा, एकतर चेंडू आत आहे किंवा चेंडू बाहेर आहे…मध्ये असं काहीच नसतं.” ब्रायन लारासोबत बोलत असताना सचिनने आपलं मत मांडलं.

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहनेही सचिनच्या मताचं समर्थन केलं असून, चेंडू स्टम्पला लागत असेल तर फलंदाजाला बाद ठरवण्यात यावं असं म्हटलंय. खेळाच्या विकासासाठी काही नियमांमध्ये बदल करणं आवश्यक असल्याचं हरभजनने सांगितलं. आपल्या कारकिर्दीत सचिनचा DRS ला विरोध होता…परंतू कालांतराने बीसीसीआयनेही DRS सुविधा वापरायला हिरवा कंदील दाखवला. परंतू अजुनही LBW निर्णयावेळी Umpire’s Call वरुन अनेकांमध्ये संभ्रम कायम असतो.