sachin_tendulkar_motherमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या दोन दशकांच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल मैदानावरील त्याच्या सहकाऱयांनी जागविलेल्या आठवणी, भाऊ अजित तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर यांनी मैदानाबाहेरील सचिनचे सांगितलेले किस्से आणि स्वतःच्या प्रवासात आठवणीत राहिलेल्या क्षणांबद्दल खुद्द सचिनने मनमोकळेपणाने साधलेला संवाद, अशा प्रफुल्लित वातावरणात बुधवारी संध्याकाळी सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र ‘प्लेईंग इट माय वे’चे प्रकाशन झाले. सचिनने या पुस्तकाची पहिली प्रत बुधवारी दुपारीच आपल्या आईला भेट दिली होती. आत्मचरित्राचे प्रकाशन झाल्यानंतर ती प्रत सचिनने आपली मुलगी सारा आणि गुरू रमाकांत आचरेकर यांना दिली.
क्रिकेटविश्वातील दिग्गजांच्या साथीने हळूहळू रंगत गेलेल्या सोहळ्यात आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. सुनील गावस्कर, रवि शास्त्री, दिलीप वेंगसरकर यांनी सचिनच्या खाद्यप्रेमाबद्दल, त्याच्यातील वेगळेपणाबद्दल खुसखुशीत चर्चा केली. त्यानंतर सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांनी ८०-९०च्या दशकातील मैदानावरील आणि ड्रेसिंग रुममधील आठवणी जागवल्या. एकमेकांसाठी केलेल्या तडजोडी, एकमेकांना दिलेली दाद दिलखुलासपणे सांगत या सर्वांनीच पुस्तकाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढवली.
सचिन तेंडुलकरच्या पहिल्या भेटीपासून आजवरच्या कौटुंबिक जीवनातील मोजक्या आठवणी अंजली तेंडुलकर यांनी मांडल्या. सचिनच्या क्रिकेट कारकीर्दीतील अविभाज्य अंग असलेला त्याचा भाऊ अजित तेंडुलकर यानेही आपल्या आठवणींना उजाळा दिला.