सुपर सीरिजमध्ये प्रथमच अंतिम फेरी गाठणारी पी. व्ही. सिंधू व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल यांच्याकडून मंगळवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल दर्जाची कामगिरी अपेक्षित आहे.
सिंधूने नुकत्याच झालेल्या डेन्मार्क खुल्या सुपर सीरिज स्पध्रेमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. तिला अंतिम फेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या लिऊ झेरुईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सिंधूने दोन वेळा जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकन मिळालेल्या सायनाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेती खेळाडू लिऊ मिशेलीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

पुरुषांच्या गटात भारताच्या किदम्बी श्रीकांतची चीनच्या तियान होवेईशी गाठ पडणार आहे. एच. एस. प्रणॉयला चीनचा नामवंत खेळाडू लिन डॅनशी झुंजावे लागणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेत्या पारुपल्ली कश्यपला पहिल्या फेरीत तुलनेने सोपी परीक्षा असेल. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या खेळाडूचा त्याच्याशी सामना होणार आहे. डेन्मार्क खुल्या स्पर्धेत त्याला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला होता.

महिलांच्या दुहेरीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेत्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांना थायलंडच्या जोंगकोल्फन कितिथाराकुल व राविंदा प्रजोंगजाई यांच्याशी खेळावे लागणार आहे. पात्रता फेरीत भारताच्या बी. साईप्रणीतला चीन तेपैईच्या त्झिुवेई वांगशी लढत द्यावी लागणार आहे. अजय जयरामला स्थानिक खेळाडू थॉमस रौक्झेलचे आव्हान असणार आहे. त्याने दोन वेळा डच खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे.