लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत यांच्या ऑलिम्पिक पात्रतेला फटका बसण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिक पात्रतेसाठीच्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत या दोघांचा समावेश अनिश्चित मानला जात आहे.

इंडिया खुली स्पर्धा लांबणीवर पडल्यानंतर सायना आणि श्रीकांतच्या आशा मलेशिया खुली (२५ ते ३० मे) आणि सिंगापूर खुली (१ ते ६ जून) या स्पर्धावर होत्या. मात्र भारतातील करोनाची वाढती संख्या पाहता, मलेशिया आणि सिंगापूर सरकारने भारतातील विमानांवर २८ एप्रिलपासून बंदी घातली आहे.

‘‘क्रीडा मंत्रालयाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत मलेशिया सरकारशी संपर्क साधला असून भारतीय बॅडमिंटनपटूंना मलेशिया खुल्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे,’’ असे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) पत्रकात म्हटले आहे.

पी. व्ही. सिंधू, सायना, श्रीकांत, बी. साईप्रणीत, सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी हे भारताचे खेळाडूू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सध्या मलेशियामध्येही करोनाची संख्या वाढली असून आतापर्यंत जवळपास १४ बॅडमिंटनपटूंना या विषाणूची बाधा झाली आहे.

सद्यस्थितीत कोणालाही मलेशियात प्रवेश करता येणार नाही, असे मलेशिया सरकारने तेथील भारतीय उच्चायुक्ताला कळवले आहे. परंतु अद्याप १९ दिवस शिल्लक असल्यामुळे या स्पर्धेत सहभागी होण्याची आशा धरायला काहीच हरकत नाही.

-भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ)