नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या वारसांना बॅटमिंटनपटू सायना नेहवालने प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत केली आहे. आज सायना नेहवालचा वाढदिवस आहे. तिच्या या कृत्यामुळे सामाजिक भान राखत सायनाने आपला वाढदिवस साजरा केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.  ११ मार्च रोजी सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे १२ जवान हुतात्मा झाले होते. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने हुतात्म्यांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत जाहीर केली.

त्याबरोबरच समाजातील विविध स्तरातील लोकांनी सुकमा जिल्ह्यातील हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या नातेवाईकांना सहकार्य केले आहे. याआधी अभिनेता अक्षय कुमारने देखील जवानांच्या कुटुंबियांना सहकार्य केले आहे. प्रत्येक हुतात्म्याच्या कुटुंबियांना अक्षय कुमारने ९ लाख रुपयांची मदत केली आहे.  या हल्ल्यामुळे आपल्यावर खूप मोठा आघात झाला असून आपणास हुतात्म्यांच्या कुटुंबियांना सहकार्य करण्याची इच्छा आहे असे अक्षय कुमारने पोलीस अधिकाऱ्यांना म्हटले होते.

त्याप्रमाणे अक्षय कुमारने पोलीस अधिकाऱ्यांमार्फत जवानांच्या कुटुंबियांना ही मदत पोहचवली. अक्षय कुमारच्या या कृत्यामुळे आपण भारावून गेलो आहोत अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली. याआधी देखील अक्षय कुमारने हुतात्म्यांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. सायना नेहवालने ही मदत केल्याचे वृत्त सोशल मिडियावर कळताच लोकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सायनाने एक उत्कृष्ट पायंडा पाडला असल्याचे लोकांनी म्हटले आहे. सायनाने समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून हे कार्य केल्यामुळे आपण तिचे अभिनंदन करत आहोत असे काही जणांनी म्हटले आहे.

भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिचा आज २७ वा वाढदिवस आहे. बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करणारी सायना नेहवाल पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करणारी ती पहिली भारतीय बॅडटमिंटनपटू ठरली होती. नेहवालच्या नावावर अनेक बॅडमिंटन स्पर्धांची जेतेपदं जमा आहेत. सायना नेहवालच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच देशात बॅडमिंटनचे महत्त्व आणि लोकप्रियतेत वाढ झाली.