लंडन ऑलिम्पिक कांस्यपदकविजेती सायना नेहवालने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपदाच्या दिशेने दमदार वाटचाल केली. सायनाने संघर्षपूर्ण लढतीत अमेरिकेच्या बेइवेन झांगवर २४-२२, १८-२१, २१-१९ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. अन्य भारतीय खेळाडूंचे आव्हान सलामीच्या फेरीतच संपुष्टात आल्याने स्पर्धेत एकमेव प्रतिनिधी राहिलेल्या सातव्या मानांकित सायनाने तासाभराच्या लढतीत झुंजार खेळ करत विजय मिळवला. पुढच्या फेरीत सायनाचा मुकाबला चौथ्या मानांकित चीनच्या सिझियान वांगशी होणार आहे.
पहिल्या गेममध्ये ३-३ अशी बरोबरी पाहायला मिळाली. मात्र यानंतर सायनाने स्मॅशच्या फटक्यांचा प्रभावी उपयोग करत १५-११ अशी आघाडी घेतली. बेइवेनने चांगली टक्कर देत १८-१८ अशी बरोबरी केली. यानंतर प्रत्येक गुणासाठी झालेल्या प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला, अखेर सायनाने लौकिकाला साजेसा खेळ करत २४-२२ अशी बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये सायनाने ३-१ अशी आघाडी मिळवली. बेइवानने प्रदीर्घ रॅलीवर भर देत ५-५ अशी बरोबरी केली. दमदार खेळ करत बेइवानने सायनाला प्रत्येक गुणासाठी झुंजवले. नेटजवळून शिताफीने खेळ करत बेइवेनने दुसरा गेम जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायनाने आघाडी घेतली मात्र बेइवेनने ही आघाडी भरून काढत बरोबरी केली. चुकांची संख्या प्रकर्षांने कमी करत सायनाने ताकदवान फटक्यांवर भर देत तिसऱ्या गेममसह सामना जिंकला.
दुसऱ्या फेरीत बिगरमानांकित खेळाडूविरुद्ध खेळतानाही सायनाला प्रयत्नांची शर्थ करावी लागली. यावरुनच आगामी फेऱ्यांमध्ये सायनासमोरील आव्हान आणखी खडतर असण्याची शक्यता आहे. हॉटेलच्या खोलीतील वातावरण अतिशय थंड असल्याने आदल्या दिवशी झोपच लागली नाही असे सायनाने सांगितले. सुदैवाने याचा सायनाच्या खेळावर परिणाम झाला नाही.