अव्वल मानांकित सायना नेहवालच्या पराभवानिशी फ्रेंच सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. थायलंडच्या रॅटचॅनोक इन्तानॉनने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सायनाला सरळ गेममध्ये पराभूत केले.

इन्तानॉनविरुद्ध ६-३ अशा विजयी कामगिरीनिशी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरील सायनाने तिचा सामना केला. परंतु सातव्या क्रमांकावरील इन्तानॉनने ३९ मिनिटांमध्ये तिचा २१-९, २१-१५ असा पराभव केला. त्याआधी, उपउपांत्यपूर्व लढतीत सायनाने जपानच्या मिनात्सू मितानीला २१-१९, २१-१६ असे पराभूत केले होते.

याशिवाय भारताच्या एच. एस. प्रणॉय, अजय जयराम यांचे पुरुष एकेरीत, तर ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांचे महिला दुहेरीत आव्हान संपुष्टात आले आहे. हाँगकाँगच्या निगकालोंग अँगुसने प्रणॉयची घोडदौड २१-१५, २१-१० अशी रोखली. प्रणॉयने दोन वेळा ऑलिम्पिकविजेत्या लिन डॅनवर मात करीत सनसनाटी कामगिरी केली होती, मात्र त्याला तशी चमकदार कामगिरी अँगुसविरुद्ध दाखवता आली नाही. चीनच्या तियान हुओवेने दोन वेळा डच स्पर्धाजिंकणाऱ्या जयरामला २१-१८, २१-८ असे सरळ दोन गेम्समध्ये पराभूत केले.

महिलांच्या दुहेरीत २०१०च्या राष्ट्रकुल विजेत्या ज्वाला व अश्विनी यांना आठव्या मानांकित एफजेई मुस्केन्स व सेलेना पिक यांच्याकडून १५-२१, १८-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.