राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यांनी यांनी आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आपली धडाकेदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करुन उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. याचसोबत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला किदम्बी श्रीकांत व एच. एस. प्रणॉयही पुढच्या फेरीत दाखल झालेले आहेत.

सायना नेहवालने आपली चिनी प्रतिस्पर्धी गाओ फेंगजीचा अवघ्या ४० मिनीटांत २१-१८, २१-८ अशा फरकाने पराभव केला. उपांत्य फेरीत सायनाची लढत कोरियाच्या बिगर मानांकित ली जँग मी विरुद्ध होणार आहे. लीने थायलंडची खेळाडू व माजी विश्वविजेती रॅचनॉक इन्तेनॉनला पराभवाचा धक्का दिला. दुसरीकडे सिंधूनेही आपल्या चिनी प्रतिस्पर्धी खेळाडूला २१-१२, २१-१५ अशा सेट्समध्ये पराभूत केलं. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची लढत कोरिया विरुद्ध थायलंड या सामन्यातील विजेत्या खेळाडूशी होणार आहे.

दुसरीकडे श्रीकांतला विजयासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. पहिल्या डावात २-७ ने आघाडीवर असताना हाँगकाँगच्या प्रतिस्पर्ध्याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली, या कारणासाठी श्रीकांतला विजेता घोषित करण्यात आलं. उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचा सामना ३ वेळा ऑलिम्पिक स्पर्धेचं रौप्यपदक पटकावणाऱ्या ली चोंग वी विरुद्ध होणार आहे. त्यामुळे पुढच्या फेरीत भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतायत याकडे सर्व क्रीडा प्रेमींचं लक्ष असणार आहे.