इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या धर्तीवर इंडियन बॅडमिंटन लीगचे गेल्या वर्षी यशस्वी आयोजन करण्यात आले. विविध अडचणींवर मात करत झालेला पहिला हंगाम बॅडमिंटनप्रेमींमध्ये लोकप्रिय ठरला. भारतीय बॅडमिंटनची ओळख असलेल्या सायना नेहवालने हैदराबाद हॉटशॉट्स या संघासाठी खेळताना सातही सामन्यात विजय मिळवत संघाच्या जेतेपदात निर्णायक भूमिका बजावली. यंदा आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे वेळापत्रक भरगच्च असल्याने आयबीएलचे दुसरे पर्व सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेने जाहीर केले. मात्र याच काळात डेन्मार्क सुपर सीरिज स्पर्धा होणार असल्याने सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडूंच्या स्पर्धेतील सहभागाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असलेल्या खेळाडूंना सुपर सीरिज स्पर्धेत खेळणे अनिवार्य असते. केवळ दुखापतग्रस्त असल्यासच त्यांना न खेळण्याची मुभा मिळते, मात्र तरीही दंडाला सामोरे जावे लागते. केवळ आयबीएलमधून मिळणाऱ्या पैशासाठी सायना, सिंधू सुपर सीरिजला अनुपस्थित राहणे योग्य दिसणार नाही. दुसरीकडे सायना, सिंधू नसल्यास आयबीएलला अपेक्षित प्रेक्षकवर्ग मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. खेळाडूंनी दोन्हीपैकी कोणत्याही पर्यायाची निवड केली तरी नुकसान त्यांचेच होणार आहे. दरम्यान आयबीएल ठरलेल्या तारखांनाच होणार असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेने स्पष्ट केले आहे. स्पर्धेच्या तारखा एखादा दिवस पुढे किंवा मागे होऊ शकतात, मात्र नियोजित कालावधीतच स्पर्धा होईल.