कर्णधारपदावरून हकालपट्टी झालेल्या सॅम्युअल इटोने कॅमेरूनला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. ‘‘मी कॅमेरूनसाठी खेळण्याचे थांबवत आहे. जगभरातल्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभारी आहे,’’ अशा शब्दांत ३३ वर्षीय इटोने आपल्या भावना व्यक्त केल्या. २०१५च्या आफ्रिकन चषक स्पर्धेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या पात्रता फेरीसाठी निवडण्यात आलेल्या कॅमेरूनच्या २५ सदस्यीय संघातून त्याला डच्चू देण्यात आला. ही फेरी होणार आहे.
नुकत्याच झालेल्या विश्वचषकातील कॅमेरूनचा ब्राझीलविरुद्धचा सामना इटोचा कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. इटोने १९९८, २००२, २०१०, २०१४ अशा चार विश्वचषकात कॅमेरूनचे प्रतिनिधित्व केले. ११६ सामन्यात कॅमेरूनचे प्रतिनिधित्व केलेल्या इटोने कॅमेरूनला २००० आणि २००८मध्ये आफ्रिका चषक स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत १८ गोलसह इटो अव्वल स्थानी आहे. कॅमेरूनसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत ५६ गोलसह अव्वल स्थानी आहे.
काही दिवसांपूर्वीच इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेतील इव्हर्टन संघाने इटोला करारबद्ध केले. कॅमेरूनसाठी खेळताना इटोला दिमाखदार कामगिरी करता आली नाही, मात्र बार्सिलोना तसेच इंटर मिलान क्लबला महत्त्वपूर्ण स्पर्धाची जेतेपदे मिळवून देण्यात त्याने निर्णायक भूमिका बजावली. २००६ला लिगा स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत तो अव्वल होता.