भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा वर्षअखेरीस पुन्हा टेनिस मैदानावर पुनरागमन करण्याच्या मानसिकतेत असून त्या दृष्टीने पुढील नियोजन केले आहे.

ऑक्टोबर २०१७ मध्ये गुडघ्याला दुखापत झाल्याने सानियाला खेळातून सक्तीने विश्रांती घ्यावी लागली होती. त्यानंतर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये सानियाने बाळाला जन्म दिल्यामुळे ती खेळापासून दूरच होती. त्यामुळे तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर ती खेळात पुनरागमन करण्याची तयारी करणार आहे. ‘‘गेल्या काही दिवसांपासून मी वजन कमी केले असून लवकरच माझे प्रशिक्षकदेखील माझ्यासमवेत प्राथमिक स्वरूपाच्या सरावासाठी दाखल होणार आहेत,’’ असे सानियाने नमूद केले.

‘‘मी आता ३२ वर्षांची असून टेनिस खेळाचा विचार करता तितकीशी तरुण नाही, पण टेनिस हेच माझे जीवन असून या खेळानेच मला सारे काही दिलेले आहे. माझ्यासाठी स्टेफी ग्राफ हा आदर्श असून, तिनेदेखील लग्न आणि मुले झाल्यानंतरही स्पर्धामध्ये सहभाग नोंदवून विजेतीपदे मिळवली आहेत. त्यामुळे मी पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे,’’ असे सानियाने सांगितले.