जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेली सानिया मिर्झा पुढील वर्षी होणाऱ्या फेड चषक स्पध्रेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या (एआयटीए) निवड समितीने सोमवारी ही घोषणा केली. तसेच या स्पध्रेकरिता सहा खेळाडूंचा समावेश असलेला संघही जाहीर करण्यात आला. ३ ते ५ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत थायलंडच्या हुआ हिन येथे आशियाई /ओशियानिक ‘आय’ गटाचे सामने होणार आहेत. सानियासह या संघात भारतातील अव्वल क्रमांकाची खेळाडू अंकित रैना, राष्ट्रीय विजेती प्रेरणा भांबरी आणि प्रार्थना ठोंबरे यांचा समावेश असून करमान कौर थंडीहिला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

याशिवाय एस. पी. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने दक्षिण आशियाई स्पध्रेकरिता भारतीय पुरुष संघाचीही घोषणा केली. गुवाहाटी येथे फेब्रुवारी महिन्यात पार पडणाऱ्या या स्पध्रेसाठीच्या भारतीय संघात साकेत मायनेनी, रामकुमार रामनाथन, सनम सिंग, विजय सुंदर प्रसंथा, पुरव राजा आणि दिविज शरन यांचा समावेश आहे. तसेच महिला संघात अंकिता, प्रेरणा, रिषिका सुंकारा, नताशा पाल्हा, प्रार्थना आणि शर्मदा बालू यांना संधी देण्यात आली आहे.