इंग्लंड आणि वेल्समध्ये जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड शनिवारी ४ मे रोजी केली जाणार आहे.
संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पाचसदस्यीय निवड समिती ३० जणांच्या संभाव्य संघातून १५ जणांच्या अंतिम संघाची घोषणा करणार आहे. ६ एप्रिल रोजी निवडलेल्या संभाव्य संघातून वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांना डच्चू देण्यात आला होता. पण आयसीसीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभाव्य संघाव्यतिरिक्त खेळाडूंची अंतिम संघात निवड करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ६ ते २३ जून दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचा सलामीचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कार्डिफ, वेल्स येथे ६ जून रोजी होईल. भारताचा दुसरा सामना ११ जूनला वेस्ट इंडिजविरुद्ध केनिंग्टन येथे तर अखेरचा साखळी सामना १५ जून रोजी एजबॅस्टन येथे पाकिस्तानशी होणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ ‘अ’ गटात आहेत. उपांत्य फेरीचे सामने १९ आणि २० जून रोजी केनिंग्टन ओव्हल येथे होतील. अंतिम लढत २३ जून रोजी एजबॅस्टनला होईल.