महिलांमध्ये कॅरोलिना-ओसाका, पुरुषांमध्ये जोकोव्हिच-पावला यांच्यात उपांत्य फेरीची झुंज

मेलबर्न : सेरेना विल्यम्सला निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये मॅच पॉइंटपासून एक गुण दूर असताना हरवण्याची किमया करून दाखवत झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाने उपांत्य फेरीत धडक दिली आहे. पुरुषांच्या गटात केई निशिकोरीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने नोव्हाक जोकोव्हिचला उपांत्य फेरीत पुढे चाल मिळाली असून त्याचा सामना लुकास पावलाशी होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात द्वितीय मानांकित राफेल नदालची ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासची झुंज आज रंगणार आहे.

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात प्लिस्कोव्हा आणि सेरेनाची झुंज तीन सेटपर्यंत रंगली. पहिल्या सेटमध्ये प्लिस्कोव्हाने ६-४ अशी बाजी मारत आघाडी घेतली, तर दुसऱ्या सेटमध्ये प्लिस्कोव्हाला सेरेनाने ४-६ असे रोखत सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतरच्या तिसऱ्या सेटमध्ये थोडासा पाय मुरगळल्यावरही सेरेनाने त्याच लयीत खेळ करत ५-१ अशी भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर ४० -३० अशी मॅचपॉइंटवर असताना फक्त एक गुण जिंकून सामन्यात बाजी मारायची, इतकेच सोपस्कार सेरेनासाठी बाकी होते. प्लिस्कोव्हाने अखेपर्यंत जिद्दीने खेळ करत सेरेनाला कडवी टक्कर दिली. सरस खेळाचे प्रदर्शन करून सलग सहा गेम जिंकत प्लिस्कोव्हाने ७-५ अशा विजयासह थेट उपांत्य फेरीत मजल मारली.

तब्बल २ तास १० मिनिटे चाललेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणांमध्ये सेरेनाचा खेळ काहीसा ढेपाळल्याचा पुरेपूर फायदा उठवत प्लिस्कोव्हाने बाजी मारली. प्लिस्कोव्हाने यापूर्वी ऑस्ट्रेलियन स्पर्धेत एकदा उपांत्यपूर्व फेरी, तर अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची सर्वोच्च कामगिरी केली आहे. आता प्लिस्कोव्हाला उपांत्य सामन्यात अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेत्या जपानच्या नाओमी ओसाकाशी झुंजावे लागणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात चौथ्या मानांकित नाओमी ओसाकाने दुखापतग्रस्त एलिना स्वितोलिनावर ६-४, ६-१ अशी सहज मात करत उपांत्य फेरीत आगेकूच केली. ओसाकाने दुसऱ्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी ती किमिको डाटे (१९९४) हिच्यानंतरची जपानची दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. सामन्यात स्वितोलिना हिला खांद्याच्या दुखापतीसाठी उपचार घेऊन खेळावे लागले. त्यामुळे ओसाकाला सहज विजय प्राप्त करणे शक्य झाले.

जोकोव्हिच पावलाशी भिडणार

पुरुष गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नोव्हाक जोकोव्हिचविरुद्ध खेळताना केई निशिकोरीला दुसऱ्या सेटमध्ये दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे जोकोव्हिचला उपांत्य फेरीत पुढे चाल मिळाली. लुकास पावलाने मिलोस राओनिकचा चार सेटच्या संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. पावलाने हा सामना ७-६, ६-३, ६-७, ६-४ असा जिंकत उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे उपांत्य फेरीत जोकोव्हिच आणि पावला यांच्यात तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात नदाल आणि त्सित्सिपास यांच्यात लढत होणार आहे.