अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आॅस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलंय. हा सेरेनाचा २३वा ग्रँड स्लॅम विजय अाहे. यावर्षीचं जेतेपद पटकावून सेरेनाने स्टेफी ग्राफचा विक्रम मोडलाय. अंतिम फेरीत सेरेनाने तिची बहीण व्हीनस विल्यम्सचा ६-४, ६-४ ने पराभव केला. सेरेनाने महिलांच्या टेनिसमध्ये आपलं अव्वल मानांकन परत मिळवलं आहे.

सेरेनाने स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँड स्लॅम विजेतेपदांची बरोबरी केलेली आहे. तर महिलांच्या टेनिस स्पर्धांमध्ये सर्वधिक ग्रँड स्लॅमची विजेती होण्यासाठी आता तिला अजून दोन विजेतेपदांची गरज आहे. सध्या हा विक्रम मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे सेरेनाच्या आजच्या विजेतेपदाच्या साक्षीदार म्हणून मार्गारेट कोर्ट प्रेक्षकांमध्ये हजर होत्या.

ग्रँड स्लॅमसाठी आॅस्ट्रेलियन ओपन, विंबल्डन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपन या स्पर्धांचा विचार होतो.

वाचा- देशही मला पित्याप्रमाणेच, मोहम्मद शमीचे कुटुंबीयांना उत्तर

आजचा विजय सेरेनासाठी भावनिकही होता याचं कारण आज स्टेफी ग्राफचा विक्रम मोडताना तिच्यासमोर तिचीच बहीण व्हीनस विल्यम्स प्रतिस्पर्धी म्हणून उभी होती. या दोघा बहिणींनी गेली दोन दशकं महिला टेनिसविश्वावर अधिराज्य गाजवलंय. सुरूवातीच्या काळात सेरेनावर व्हीनसचा गेम भारी पडायचा. एकमेकांच्या करिअरमधले चढउतार या दोघी बहिणींनी सोबत राहत पाहिले आहेत. गेल्या काही वर्षात सेरेनाचा खेळ कमालीचा सुधारला आणि व्हीनसला दुखापती आणि प्रकृतीच्या इतर कारणांमुळे एकेरी टेनिसपासून दूर राहावं लागलं होतं. याआधी अनेक वेळा व्हीनस आणि सेरेना फायनलमध्ये एकमेकींच्या समोर आल्यावर सेरेनाला व्हीनसच्या हस्ते पराभव स्वीकारावा लागला आहे.

वाचा- जिद्दी दिमित्रोव्हने नदालला झुंजवले

आजच्या या विजयासोबत सेरेनाने महिलांच्या टेनिसमधलं आपलं अव्वल मानांकन पुन्हा मिळवलंय. गेल्या वर्षी सप्टेंबरनंतर सेरेनाच्या स्थानाला अँजेलिक कर्बरने धक्का दिला होता. पण आपलं अव्वल स्थान सेरेनाने आता पुन्हा खेचून घेतलंय. आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेनाला दुसरं मानांकन तर व्हीनसला १३वं मानांकन मिळालं होतं. वयाच्या ३६व्या वर्षी एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारणाऱ्या व्हीनसची कामगिरीही उल्लेखनीय आहे.