रेयाल माद्रिदविरुद्धच्या लढतीत खेळण्याबाबत साशंकता

पॅरिस सेंट-जर्मेनचा (पीएसजी) प्रमुख खेळाडू नेयमारच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पायाचा घोटा व बोटे जोडणाऱ्या पाच अस्थींपैकी एक फ्रॅक्चर झाले असून पायाचा सांधा मुरगळला आहे. त्यामुळे मे अखेरिसपर्यंत त्याला सक्तीची विश्रांती करावी लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या परतीच्या लढतीत रेयाल माद्रिदविरुद्ध त्याला खेळता येणार नाही.

ब्राझीलच्या नेयमारला गतवर्षी पीएसजीने विक्रमी किंमतीत बार्सिलोना क्लबकडून आपल्या चमूत दाखल करून घेतले होते. नेयमारने पीएसजीकडून खेळताना २० सामन्यांत १९ गोल केले आहेत. रविवारी झालेल्या लीग-१ लढतीत मार्सेइलेविरुद्धच्या लढतीत नेयमारला दुखापत झाली. पीएसजीने ३-० अशा फरकाने ही लढत जिंकली असली तरी नेयमारच्या दुखापतीने त्यांची चिंता वाढवली आहे.

नेयमारच्या अनुपस्थितीत पीएसजीला चॅम्पियन्स लीगच्या परतीच्या लढतीत माद्रिदचा सामना करावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील लढतीत माद्रिदने ३-१ अशा फरकाने पीएसजीला पराभूत केले आहे आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी परतीच्या सामन्यात त्यांना बरोबरीही पुरेशी ठरणारी आहे. ६ मार्चला पॅरिसमध्ये ही लढत होणार आहे.

‘‘नेयमारचा वैद्यकीृय चाचणी अहवाल समोर आला असून त्याच्या उजव्या पायाचा सांधा मुरगळला आहे आणि त्याच्या पायाचा घोटा व बोटे जोडणाऱ्या पाच अस्थीपैकी एक फ्रॅक्चर झाले आहे,’’ असे पीएसजीने स्पष्ट केले आहे.

गतवर्षी नेयमारचा ब्राझील संघातील सहकारी गॅब्रीएल जीजस याला याच दुखापतीमुळे दोन महिन्यांची विश्रांती घ्यावी लागली होती. इंग्लंडचा माजी खेळाडू डेव्हिड बेखम आणि वेन रूनी यांनाही सहा आठवडय़ाच्या विश्रांतीवर जावे लागले होते. ब्राझील फुटबॉल संघाचे चाहत्यांचेही नेयमारच्या तंदुरुस्तीकडे लक्ष लागले आहे. २०१४च्या विश्वचषक स्पध्रेत नेयमारला दुखापत झाली होती आणि जर्मनीकडून पराभूत झाल्याने ब्राझिलचे आव्हान संपुष्टात आले होते.

नेयमारच्या दुखापतीबाबत सेंट-जर्मेनचे प्रशिक्षक यूनाई इमेरी यांनी सांगितले की,‘‘नेयमारच्या पायावर शस्त्रक्रीया करण्याबाबतचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.  मी डॉक्टरांशी भेट घेतली आणि त्यांनीही शस्त्रक्रीयेबाबतचा निर्णय नंतर घेतला जाईल असे सांगितले. रेयाल माद्रिद विरुद्ध नेयमार खेळण्याची संधी कमीच आहे. तरीही आम्ही आशावादी आहोत. रेयालचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत.’’

नेयमारच्या तंदुरुस्तीबाबत झिदान आशावादी

रेयाल माद्रिद क्लबचे प्रशिक्षक झिनेदीन झिदान यांनी नेयमार तंदुरुस्त होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. नेयमारच्या दुखापतीच्या वृत्ताने मी निराश झालो आहे आणि आशा करतो की माद्रिदविरुद्धच्या लढतीत तो मैदानात उतरेल. प्रतिस्पर्धी खेळाडू दुखापतीमुळे बाहेर बसलेला मला कधीच आवडत नाही, असे झिदान यांनी सांगितले.