पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि भारतीय संघातील खेळाडूंमध्ये रंगणारं द्वंद्व आता प्रत्येकाला परिचित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर आफ्रिदी सोशल मीडियावर सक्रीय असतो. अनेकदा काश्मीर आणि भारत सरकारविरोधी वक्तव्यामुळे आफ्रिदीला भारतीय नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वी आफ्रिदीला करोनाची लागण झाली होती, यामधून सावरत असताना त्याने पुन्हा एकदा भारतीय संघाची खोडी काढली. क्रिककास्ट या यू-ट्युब कार्यक्रमात बोलत असताना शाहिद आफ्रिदीने, “पाकिस्तानी संघाने भारताला अनेकदा हरवलंय. आम्ही भारतीय संघाला अशा पद्धतीने हरवायचो की सामना संपल्यानंतर आम्हालाच जरा वाईट वाटायचं आणि आम्ही त्यांची माफी मागायचो”, असं वक्तव्य केलं. या वक्तव्याचा समाचार घेत भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा याने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाला होता आफ्रिदी?

“आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असताना तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर असणं गरजेचं असतं. प्रत्येक सामन्यात चाहत्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतात, प्रत्येक सामन्यात तुम्ही चांगली कामगिरी करावी अशी त्यांची अपेक्षा असते. भारताविरुद्ध खेळायला मला नेहमी आवडतं. आम्ही अनेकदा भारतीय संघाला हरवलं आहे, आम्ही त्यांना इतक्या वाईट पद्धतीने हरवायचो की नंतर आम्हालाच वाईट वाटायचं आणि सामना संपल्यानंतर आम्ही त्यांची माफी मागायचो. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांविरोधात खेळताना नेहमी कस लागतो. हे दोन्ही संघ चांगले आहेत आणि त्यांच्या विरोधात त्यांच्याच देशात चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्हाला १०० टक्के तयार असावं लागतं”, असं आफ्रिदी म्हणाला होता.

भारतीय माजी खेळाडूचं सडेतोड उत्तर

आफ्रिदीच्या दाव्याचा आकाश चोप्राने चांगलाच समाचार घेतला. आपल्या यू ट्युब चॅनेवरून त्याने आफ्रिदीलाच आकडेवारीची आठवण करून दिली. “काही जाणकारांच्या मते सर्पदंशालाही औषध असतं, पण मुद्दाम करून घेतलेल्या गैरसमजाला मात्र काहीच औषध नसतं. (तसं आफ्रिदीचं झालं आहे.) आफ्रिदीच्या काळात भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ समतोल होते. त्याच्या काळात परिस्थिती भारताच्या बाजून झुकायला सुरूवातही झाली होती आणि आताच्या काळातील क्रिकेटबद्दल बोलायचं तर त्यात तर भारत खूप पुढे आहे. विश्वचषकाची आकडेवारी एकदा आठवून पाहा. सगळं चित्र स्वच्छपणे दिसेल. तुम्ही (पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि चाहते) नेहमी २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलबद्दलच बोलता, पण हे विसरू नका की त्या स्पर्धेतदेखील भारताने पाकिस्तानला एका सामन्यात धूळ चारली होती. टीम इंडियाचं क्रिकेटमधील वर्चस्व आता वेगळ्याच स्तरावर आहे. इतकंच नव्हे, तर भारत ऑस्ट्रेलियात गेला होता, तेव्हा क्रिकेट मालिका जिंकून आला होता. पाकिस्तानच्या संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा मात्र पूर्णपणे अपयशी ठरला होता. म्हणूनच दोन संघांमध्ये सध्या खूप फरक आहे”, असे दमदार उत्तर त्याने आफ्रिदीला दिले.