करोनामुळे सध्या जगभरातील महत्वाच्या क्रीडा स्पर्धा बंद झालेल्या आहेत. या काळात अनेक खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी गप्पा मारत क्रिकेटचा माहोल कायम ठेवत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणसोबत सोशल मीडियावर गप्पा मारल्या. या गप्पांदरम्यान शिखरने अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबादकडून दिल्ली संघाकडे माझी ट्रान्स्फर झाल्यानंतरचा काळ माझ्यासाठी खेळाडू म्हणून खडतर होता असं शिखरने म्हटलंय.

आयपीएलमध्ये शिखरने याआधीही दिल्लीचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र यानंतर तो ८ वर्ष सनराईजर्स हैदराबादचं प्रतिनिधीत्व करत होता. २०१६ साली या संघाने आयपीएलचं विजेतेपदही पटकावलं होतं. मात्र २०१९ च्या हंगामात Player Transfer Window अंतर्गत शिखर धवन पुन्हा एकदा दिल्लीच्या संघात आला. हैदराबादकडून पुन्हा दिल्लीकडे आल्यानंतरचा काळ आपल्यासाठी खडतर होता. “हैदराबादसाठी मी सातत्याने चांगली कामगिरी करत आलो होतो. मात्र त्याच दरम्यान दिल्लीच्या संघाची आयपीएलमधली कामगिरी फारशी चांगली होत नव्हती. मात्र या आव्हानाचं मी संधीत रुपांतर केलं आणि दिल्लीकडून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.” शिखर इरफान पठाणसोबत बोलत होता.

नवीन कर्णधार, नवीन संघ व्यवस्थापन आणि नवीन प्रशिक्षकांसह मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाने २०१९ साली चांगली कामगिरी केली. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ प्ले-ऑफपर्यंत पोहचला. उपांत्य फेरी गाठणं दिल्लीच्या संघाला जमलं नाही, परंतू या स्पर्धेत शिखर धवनसह दिल्लीच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी ही कौतुकास्पद होती. दरम्यान, देशातली सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगामही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारं आर्थिक नुकसान मोठं असणार आहे. याचसाठी स्पर्धा रद्द न करता वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.