ईशान्य भारतातील मणिपूर, मिझोराम भागात फुटबॉलचे वेड जोपासले जाते. मेघालयातील शिलाँग येथील शिलाँग लजाँग हा संघ आय-लीगसारख्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहे.  राष्ट्रीय पातळीवर त्यांची कामगिरीही चांगली होत आहे. आसाम-मेघालय सीमेवर असलेल्या राणी भागातील या मुलींच्या फुटबॉलप्रेमाची कथा ‘सॉकर क्वीन्स ऑफ राणी’ या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. गुवाहाटीपासून काही अंतरावर असलेल्या या गावात अद्याप वीज पोहोचलेली नाही. या मुली गरीब, कृषिधिष्ठित कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यातील एका मुलीची आई व भाऊ दगडखाणीत काम करतात. एका मुलीचे वडील वाळूचे काम करतात. एका मुलीची आई हातगाडी चालवते व किरकोळ खाद्यपदार्थ विकते. या मुलींसाठी फुटबॉल वरदान ठरेल, असे त्यांना वाटते. फुटबॉल शिकण्यासाठी या मुली सायकलवर किंवा पायी चालत येतात. त्यांच्या फुटबॉलप्रेमाविषयी त्या भरभरून बोलतात. शाळेतून वेळ मिळाला, की त्या सराव करतात, शिवाय घरची कामेही करतात.
जेव्हा जगात फुटबॉलचा ज्वर टिपेला पोहोचला आहे, तेव्हा भारतात आसामसारख्या छोटय़ा राज्यात शेतीवर चरितार्थ चालवणाऱ्या कुटुंबातील ४० गरीब मुलींना फुटबॉल आपल्याला गरिबाच्या शापातून बाहेर येण्यासाठी हात देईल, अशी आशा आहे. ब्रिटनच्या डेव्हिड बेकहॅमसारखी लवचीकता असलेल्या या मुलींवर चित्रपट काढण्यात येत आहे. त्यांचे प्रशिक्षक हेम दास यांनी या मुलींना फुटबॉल शिकवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे चित्रण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
दास हे सुरुवातीला या भागात फुटबॉल खेळण्यात रस असलेल्या तरुण मुलांना शोधण्यासाठी जात. एके दिवशी त्यांना या मुलींनी  गराडा घातला आणि फुटबॉल शिकवण्याचा हट्टच धरला. या चित्रपटात या फक्त मुलींच्या केवळ फुटबॉलप्रेमाची कहाणी नव्हे तर त्यांच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचेही प्रतिबिंबही उमटत आहे. प्रगतीची फळे समान पद्धतीने मिळाली नाहीत, हेच आधुनिक विकासातून दिसून येते, असे त्याचे सूत्र आहे. ईशान्य भारताच्या दृष्टीनेही हा चित्रपट महत्त्वाचा आहे. या चित्रपटाच्या रूपातील माहितीपटाचे निर्माते उत्पल बोरपुजारी आहेत.
दास हे आसामचे माजी खेळाडू असून ते यंग स्टार फुटबॉल कोचिंग क्लब चालवतात. दास हे त्यांच्या अर्जित रकमेतील बराच पैसा राणी येथे जाण्यासाठी वापरतात, ते तेथे महिन्यातून वीस दिवस मुलींना फुटबॉल शिकवतात, त्यांना फुटबॉलचे साहित्यही त्यांनीच घेऊन दिले आहे. यातील अनेक मुली १४ वर्षांखालील व १७ वर्षांखालील राज्य व राष्ट्रीय शालेय संघात खेळल्या आहेत. हा माहितीपट या तरुण मुलींच्या आशेची कहाणी आहे.