शिवछत्रपती पुरस्कार जाहीर होण्यास तीन वर्षे विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करताना क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत यांनी असा गोंधळ पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही मंगळवारी पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात दिली.
राज्य शासनातर्फे दरवर्षी सवरेत्कृष्ट खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांना शिवछत्रपती पुरस्कार दिला जातो. मात्र गेली तीन वर्षे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला नव्हता आणि पर्यायाने त्याचे वितरणही झाले नव्हते. नुकतेच या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. २००९-१०, २०१०-११, २०११-१२ या वर्षांचे पुरस्कार देऊन मंगळवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारविजेत्यांना मंगळवारी सन्मानित करण्यात येणार होते. मात्र हे दोघेही नेते गैरहजर राहिले.
हा पुरस्कार दरवर्षी जाहीर झालाच पाहिजे व त्याचे वितरणही लगेच व्हायला पाहिजे. असा विलंब होणे उचित नाही, असे सांगत त्यांनी आपल्याच खात्याबाबत नाराजीही व्यक्त केली.
गेली तीन वर्षे हा समारंभ न झाल्यामुळे खेळाबाबत राज्यकर्त्यांमध्ये उदासीनता आहे, अशीच टीका करण्यात येत होती. त्याचा परामर्श घेत सामंत यांनी आपल्याकडे हे खाते आल्यामुळेच पुरस्कार जाहीर झाले, असे सांगून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थित क्रीडाप्रेमींमध्ये हास्याचे फवारेच उडाले.
मुख्य वक्त्यांच्या अनुपस्थितीत सामंत तसेच राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी कार्यक्रमात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत काही नवीन घोषणा ते करतील अशी अपेक्षा होती. मात्र यापूर्वीच जाहीर झालेल्या क्रीडा धोरणातील काही तरतुदी त्यांनी पुन्हा येथे मांडल्या.
‘‘तालुकास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या क्रीडा संकुलांद्वारे क्रीडा विकास करण्याच्या हेतूने तालुका स्तरावर क्रीडाधिकारी नियुक्त केले जातील. कुस्ती प्रशिक्षण केंद्रे, व्यायामशाळांच्या बांधकामांसाठी सात लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कबड्डी व कुस्तीच्या विकासाकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाची अधिकाधिक मॅट्स देण्यासाठी शासकीय अनुदान दिले जाणार आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूला एक कोटी रुपये तर त्याच्या प्रशिक्षकाला २५ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल,’’ असे वळवी म्हणाले.
नवीन क्रीडा सचिवांचा श्रीगणेशा
राज्याच्या क्रीडा व शिक्षण सचिव म्हणून अश्विनी भिडे यांनी मंगळवारीच सूत्रे हाती घेतली आणि शिवछत्रपती वितरण समारंभ हाच त्यांच्यासाठी पहिला समारंभ ठरला. त्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला. खेळाडूंच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

जीवनगौरवांकरिता टाळ्यांचा कडकडाट!
कुस्ती संघटक बाळासाहेब लांडगे व ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ डॉ. भीष्मराज बाम यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या वेळी सर्वानी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. जीवनगौरव पुरस्काराचे आणखी एक मानकरी अटलबहादूर सिंग हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचा पुरस्कार नागपूरचे वरिष्ठ क्रीडाधिकारी विजय सन्ता यांनी स्वीकारला. या समारंभास खासदार सुरेश कलमाडी, सुप्रिया सुळे यांनीही पाठ फिरविली. मात्र आमदार संग्राम थोपटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे, पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे आदी आवर्जून उपस्थित होते.