आव्हानवीर मॅग्नस कार्लसनने आपल्या शैलीला साजेसा खेळ केला आणि जगज्जेतेपदाच्या पाचव्या डावात विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा पराभव करून मालिकेत ३-२ अशी आघाडी घेतली. प्रतिस्पध्र्यापुढे यक्षप्रश्न निर्माण करून त्याला त्यामध्ये गुंतवून ठेवायचे आणि तो दमला की त्याला पराभूत करायचे ही मॅग्नसची शैली.
जगातील सर्वोच्च मानांकित खेळाडू मॅग्नस कार्लसनरूपी अजगराच्या विळख्यातून सुटका करून घेणे, हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे! जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने मॅग्नसच्या विळख्यातून आपली सुटका करून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि तो जवळजवळ यशस्वी झालाही होता. परंतु आव्हानवीराने आपला खेळ उंचावत नेला आणि ५८ चालींनंतर जगज्जेत्याला पराभव स्वीकारावा लागला.
आनंदला त्याच्या कारकिर्दीत स्लाव बचावाने नेहमीच हात दिलेला असला तरी जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पध्रेत मोक्याच्या वेळी त्याच बचावाने त्याला दगा दिला आहे. मला आठवतो त्याचा १९९१ साली त्याने हरलेला अनातोली कार्पोवविरुद्धचा आठवा आणि अखेरचा डाव! कार्पोवसारख्या दिग्गजाविरुद्ध अखेरचा डाव आनंद हरला होता तो याच बचावात! आज मॅग्नसने सुरुवातीपासून आनंदला कायम दबावात ठेवले होते आणि जगज्जेता शेवटी नामोहरम झाला.
या डावाचे वैशिष्टय़ म्हणजे मॅग्नसने वेळप्रसंगी आपली मोहरी मागे नेवून आनंदला सतत कोडय़ात टाकले. एका प्याद्याचा बळी देऊन जगज्जेत्याने मॅग्नसला फार काही करू दिले नाही, पण अखेर आनंदला डावाच्या अंतिम भागात दोन प्यादी गमवावी लागली आणि तेथेच त्याच्या राजाची मृत्युघंटा वाजली.
जगातील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू हिकारू नाकामुरा अमेरिकेतून हा डाव बघत होता. ‘‘आनंदला झाले आहे काय?’’ अशा शब्दांत वैतागून हिकारूने विचारले. ‘‘शेवटी शेवटी तर आनंद फार चुका करत होता. जाऊ दे! तो आता म्हातारा झाला,’’ अशी नाकामुराची टिप्पणी होती .  
आतापर्यंतचा इतिहास पाहता टोपालोवविरुद्धचा सामना असो किंवा त्याचा बोरिस गेल्फंडविरुद्धचा सामना असो, आनंदने एखादा डाव हरल्या-हरल्या पुढील डाव जिंकून पलटवार केला आहे. जगज्जेता आपली ठेवणीतील अस्त्रे बाहेर काढेल का? त्याने नाकामुराचे वक्तव्य खोडून काढले तर सगळे भारतीय फार आनंदी होतील.
“सात डाव बाकी असताना ३-२ अशी आघाडी मिळवणे आनंददायी आहे. डावाची सुरुवात अनोखी झाली. अचूक डावपेचांचा फायदा मिळाला. परिस्थिती गोंधळाची होती परंतु त्यातून मार्ग काढत मी विजय मिळवला. परंतु आणखी मेहनत करण्याचा धडा मिळाला आहे.”
मॅग्नस कार्लसन

माझे प्रत्युत्तर अपयशी
“कार्लसनने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. त्याच्या खेळाला मी दिलेले प्रत्युत्तर अपयशी ठरले. माझ्या हातून चुका घडतच गेल्या. आरडी ४ची खेळी ही निर्णायक क्षणी माझ्या हातून झालेली चुक होती.”
विश्वनाथन आनंद