अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले

नाशिक : वडिलांचे निधन झाल्यानंतर काही तासांच्या अंतराने आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे (४२) यांचे येथे गुरुवारी सकाळी करोना आजारामुळे निधन झाले. भारतीय नेमबाजी संघाला प्रशिक्षण देणाऱ्या चार जणांच्या चमूत त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पश्चात आई आणि विवाहित बहीण आहे.

ऑलिम्पिक पदक विजेते नेमबाज तयार करण्याच्या उद्देशाने दिवंगत

क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी येथे १९९९ मध्ये एक्स-एल शूटर्स असोसिएशनची स्थापना के ली. तेव्हापासून बाम यांच्या मार्गदर्शनाखालीच तयार झालेल्या राष्ट्रीय नेमबाज मोनाली गोऱ्हे यांनी या संस्थेत नवोदितांना प्रशिक्षण देणे सुरू के ले.

बाम यांच्यानंतर त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी संस्थेची बहुतांशी जबाबदारी त्यांनीच पेलली. मोनाली यांनी प्रशिक्षक म्हणून के लेल्या कामाची दखल भारतीय नेमबाजी फे डरेशनच्या आधी श्रीलंके च्या क्रीडा मंत्रालयाने घेतली. २०१८च्या दक्षिण आशियाई

क्रीडा स्पर्धेत मोनालीच्या मार्गदर्शनाखालील श्रीलंका संघाने चार पदकांची कमाई के ली होती. त्यानंतर भारतीय संघाच्या चार प्रशिक्षकांच्या चमूत मोनाली यांना सहभागी करण्यात आले.

नेमबाजी हा महागडा खेळ असून सर्वसामान्यांना तो परवडणारा नसल्याचा समज खोडून काढण्यावर मोनाली यांनी भर दिला. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भीष्मराज बाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांसाठी मोफत नेमबाजी शिबिरे त्यांनी घेतली. याशिवाय विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधून त्यापैकी गुणवंत खेळाडूंना शिष्यवृत्ती देणेही त्यांनी सुरू के ले. आपल्या कें द्रात खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी मोनाली या अखेपर्यंत कार्यरत राहिल्या. नाशिकच्या श्रेया गवांदे, श्रद्धा नालमवार, अक्षय अष्टपुत्रे यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारण्यासाठी मोनाली यांनी वेळोवेळी के लेले मार्गदर्शन कामाला आले. त्यांनी मनीषा राठोड, अपूर्वा पाटीलसह अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले.

शेवटपर्यंत अविवाहित राहिलेल्या मोनाली यांचे एक्स-एल शूटर्स असोसिएशनच्या वतीने खेळाडूंना प्रशिक्षणासाठी निवासी व्यवस्था करण्याचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. त्यांच्या निधनामुळे नाशिकच्या नेमबाजी क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना खेळाडू आणि प्रशिक्षकांनी व्यक्त के ली आहे.

मनोहर गोऱ्हे यांचे निधन

आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे वडील मनोहर (बापू) गोऱ्हे (७३) यांचे येथे बुधवारी रात्री करोना आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मोनालीचे गुरुवारी सकाळी निधन झाले. वडील आणि मुलीचे अवघ्या काही तासांच्या अंतराने निधन झाले. मनोहर गोऱ्हे हे इंदिरानगर जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी होते. श्री दत्तगुरु सेवा संस्थानचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.