श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला ठसा उमटवला. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात दिल्लीचा संघ यशस्वी झाला परंतू अंतिम फेरीत त्यांची डाळ शिजू शकली नाही. ५ गडी राखून मुंबईने दिल्लीवर मात केली. विजेतेपद मिळवण्यात दिल्लीचा संघ अपयशी ठरला असला तरीही श्रेयस अय्यरच्या नेतृत्वगुणांचं चांगलंच कौतुक झालं. दिल्लीच्या संघातील त्याचा साथीदार अ‍ॅलेक्स कॅरीने श्रेयसमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचे गुण असल्याचं म्हटलं आहे.

“श्रेयसमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्याचे गुण आहेत यात काही शंकाच नाही. येत्या काळात श्रेयस एक चांगला कर्णधार म्हणून समोर येईल. संघातील प्रत्येक खेळाडूशी संवाद साधणं…त्यांच्या प्रतिक्रिया विचारत राहणं हा त्याचा चांगला गुण आहे. अनेकदा तो स्वतःच्या कामगिरीचा विचार न करता संघाची काळजी करतो. गेल्या काही हंगामापासून तो दिल्लीचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करत आहे.” हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कॅरीने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – MPL Sports टीम इंडियाचा ‘किट स्पॉन्सर’, BCCI कडून अधिकृत घोषणा

सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा दिल्लीचा अखेरच्या टप्प्यात रुळावरुन खाली घसरला. परंतू उपांत्य फेरीत हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या खेळाडूंनी धडाकेबाज खेळ करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं.