वॉवरिंका, हॅलेप यांचे आव्हान कायम, चार तासांच्या झुंजीनंतर अँडरसन विजयी

विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या अ‍ॅण्डी मरे, स्टॅनिस्लास वॉवरिंका व सिमोना हॅलेप यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील चौथ्या फेरीकडे वाटचाल केली. दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने चार तासांच्या लढतीनंतर इंग्लंडच्या काईल एडमंडचे आव्हान संपुष्टात आणले.

अव्वल मानांकित मरेने ज्युआन मार्टिन डेल पोत्रोचा ७-६ (१०-८), ७-५, ६-० असा पराभव केला. डेल पोत्रोने मरेला पहिल्या दोन सेट्समध्ये चिवट लढत दिली. मरेला या दोन्ही सेट्समध्ये प्रत्येक गुणासाठी संघर्ष करावा लागला. पहिल्या सेटमधील टायब्रेकरही खूप रंगतदार झाला. दुसऱ्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंनी वेगवान सव्‍‌र्हिस व परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग केला. तिसऱ्या सेटमध्ये मात्र मरेच्या झंझावाती खेळापुढे डेल पोत्रोला आपला बचाव करता आला नाही.

तृतीय मानांकित वॉवरिंकाने इटलीच्या फॅबिओ फोगिनीवर ७-६ (७-२), ६-०, ६-२ अशी मात केली. स्पेनच्या फर्नाडो वेर्दास्कोने २२व्या मानांकित पाब्लो क्युवेसवर (उरुग्वे) ६-३, ६-१, ६-३ असा सफाईदार विजय मिळवला.

अँडरसनने पाच सेट्सपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या लढतीत एडमंडला हरविले. त्याने हा सामना ६-७ (६-८), ७-६ (७-४), ५-७, ६-१, ६-४ असा जिंकला.  अँडरसन व एडमंड यांच्यातील लढतीद्वारे प्रेक्षकांना टेनिसचा खरा आनंद घेता आला. दोन्ही खेळाडूंनी सव्‍‌र्हिस, परतीचे फटके व व्हॉलीज याचा सुरेख खेळ केला. चौथ्या सेटमध्ये एडमंडची दमछाक झाली. तरीही त्याने पाचव्या सेटमध्ये आव्हान टिकवण्यासाठी शर्थीची झुंज दिली. अखेर अँडरसनने क्रॉसकोर्ट फटक्यांचा उपयोग करीत महत्त्वपूर्ण ब्रेक मिळवला व त्याच्या आधारे हा सेट घेतला.

महिलांमध्ये नववी मानांकित अग्निझेका रडवांस्का व १४वी मानांकित एलिना व्हेसनिना यांना पराभवाचा धक्का बसला. फ्रान्सच्या अ‍ॅलिझो कॉर्नेटने एकतर्फी लढतीत रडवांस्काचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडवला. या लढतीत तिने स्थानिक प्रेक्षकांच्या पाठिंब्याच्या जोरावर सात वेळा सव्‍‌र्हिसब्रेक नोंदवला.

तृतीय मानांकित हॅलेपने अपराजित्व राखताना रशियाच्या दारिया कसाटकिनाला ६-१, ७-५ असे पराभूत केले. स्पेनच्या कार्ला सोरेझ नॅव्हेरोने व्हेसनिनाचा ६-४, ६-४ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. फ्रान्सच्या कॅरोलीन गार्सियाने चौथ्या फेरीकडे वाटचाल करताना चीन तैपेईच्या सुई वेई हिसेहीचा ६-४, ४-६, ९-७ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव केला.